
• मृत्यूची शहानिशा करा; नगरसेवक पप्पू देशमुख यांचे मनपा आयुक्तांना पत्र
• मृत्युमुखी पडलेल्या डुकरांना डम्पिंग यार्डात फेकले
चंद्रपूर : मागील एक आठवड्यात चंद्रपूर शहरात १०० च्या जवळपास डुकरांचा मृत्यू झालेला आहे.चंद्रपूर महानगरपालिकेच्या तिन झोन मध्ये मृत पावलेली डुकरे उचलण्यासाठी आलेल्या तक्रारीच्या आधारावर ही माहिती मिळालेली आहे. वडगाव प्रभागाचे नगरसेवक पप्पू देशमुख यांना मागील एक आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात घराजवळ डुक्कर मृत झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या.अचानक मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यामुळे देशमुख यांनी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. तेव्हा एकट्या वडगाव प्रभागात आठवड्याभरात 35 ते 40 डुक्कर मरण पावल्याची माहिती त्यांना मिळाली.यानंतर त्यांनी मनपाच्या तीनही झोन मधून माहिती घेतली असता सुमारे १०० डुकरांचा एका आठवड्यात मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली.
एका आठवड्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर डुकरांचा मृत्यू होणे सामान्य बाब नाही. डुक्कर मारण्यासाठी विषारी औषध देणे किंवा डुक्करांमध्ये साथीचा आजार असणे अशी कारणे यामागे असू शकतात. डुक्करांमध्ये साथीचा आजार पसरणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा धोकादायक होऊ शकते.त्यामुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेता डुकरांचे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मृत्यूच्या कारणांची तज्ञ पशुवैद्यकीय वैद्यकीय चिकित्सक यांचेकडून शहानिशा करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक देशमुख यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते व उपायुक्त विशाल वाघ यांना पत्र देऊन केलेली आहे.