तलावात विष टाकल्याने निलगाईसह १६ बकऱ्यांचा मृत्यू ; तिघे शिकारी अटक

0
349
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) वनपरिक्षेत्र अंतर्गत जिवनापूर गावजवळील सायगाव येथे (गट क्र. ५३७) या मामा तलावात विष टाकल्याने दोन निलगाईसह सोळा बकऱ्या मृत्यूमुखी पडल्याची खळबळजनक घटना काल शुक्रवारी घडली. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये निकेश संपत ननावरे (३७), प्रवीण भैयाजी धनविजय (२३),अण्णा ऋषी बनकर (५५) यांचा समावेश आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटत आहेत. त्यामुळे वन्यप्राणी गाव तलावांच्या दिशेने धाव घेऊन आपली तृष्णा भागवित आहेत. हे चित्र दरवर्षी उन्हाळ्यात पाहायला मिळते. याच संधीचा फायदा घेत शिकारी वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी नवनवीन बेत आखतात. तलावात विषप्रयोग करून शिकार करण्याचा असाच एक प्रयोग तळोधी (बा.) परिसरात सायगाव येथील मामा तलावात उघडकीस आला आहे.

सायगाव या मामा तलावात पळसगाव जाट येथील आरोपी निकेश संपत ननावरे, प्रवीण भैयाजी धनविजय,अण्णा ऋषी बनकर या आरोपींनी तलावात वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येत असल्याने विष टाकले. तलावावर पाणी पिण्यासाठी आलेल्या एका निलगाईने विषयुक्त पाणी पिल्याने ती मृत्युमुखी पडली. नीलगाय मरण पावल्या नंतर या तलावात शेळ्या पाणी पिण्यासाठी आल्या असता त्यांनी पाणी पिताच सोळा शेळ्या मृत्यमुखी पडल्या.
त्यानंतर आरोपींनी या नीलगायच्या शरीराचा अर्धा भाग कापून विकला व उर्वरित अर्धा भाग कापण्यासाठी तलावाकडे गेले असता काही गुराख्यांना हा प्रकार दिसला. गुराख्यांनी हा प्रकार पाहिल्याने त्यानी तेथून पळ काढला. त्यानंतर या घटनेची माहिती वनविभाग व पोलिसांना देण्यात आली.

वनविभागाला माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी के. आर धोंडने, ए सी फ आर.एम. वाकडे, वन क्षेत्र सहाय्यक कार्तिक गरमडे, वनरक्षक प्रशांत गायकवाड, वनरक्षक सचिन चौधरी यांनी घटनास्थळी येवून चौकशी केली. आरोपीना पळसगाव जाट येथून ताब्यात घेण्यात आले आहे. सदर घटनेतील वन्यप्राणी आणि पाळीव शेळ्यांचा पंचनामा करून पशुधन विकास अधिकारी डॉ. गिरीष गभणे, डॉ.एस.एस.गवारे, डॉ. व्ही. बी.सुरपाम, वाय.एस.वाघरे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर बकऱ्यांना जाळन्यात आले व नीलगाय च्या काही भाग जमिनीत दफण करण्यात आला. पुढील तपास वन विभाग व पोलीस करीत आहेत.