दीड वर्षाच्या चिमुकलीसह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : एका विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे आज शनिवारी सकाळी 10.30 वाजता उघडकीस आली. कोमल उमेश उलमाले (30) व श्रुती उमेश उलमाले (दिड वर्ष) रा. मारेगाव असे मृतक आई व मुलीचे नाव आहे. या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे.

सुत्रानुसार, मृतक कोमल उमेश उलमाले (30) ही मारेगाव शहरात प्रभाग क्रमांक 12 येथे शासकीय विश्राम गृहाजवळ आपले पती उमेश उलमाले व मुलगी श्रुतीसह राहायची. तिच्या पतीचे आंबेडकर चौक येथे दुकान आहे. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास घरी सर्व मंडळी झोपलेले असताना कोमल ही आपल्या दीड वर्षाच्या मुलीला घेऊन घरून निघून गेली. दरम्यान मुलगी व आई घरात नसल्याचे पतीला लक्षात आल्यावर त्यांनी तिचा रात्री शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र ती आढळून आली नााही.

अखेर आज शनिवारी ((२० मार्च २०२१) सकाळी कोमलच्या पतीने मारेगाव पोलीस ठाणे गाठत पत्नी व मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दरम्यान मृतकाच्या घराजवळच असणा-या पुरके आश्रम शाळेनजीक असलेल्या थेरे यांच्या शेतातील विहीरीत मृतकाच्या पायातील चपला आढळून आल्या. नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. दरम्यान विहिरीत गळ टाकून शोध घेतला असता यात कोमल आणि तिच्या दीड वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.