अनावश्यक पत्रकबाजी करणाऱ्या अधिष्ठाता डॉ.हुमणे यांना संचालकांनी फटकारले

0
157
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• कंत्राटी सेवेत अनियमितता झाल्याची संचालक डॉ. लहाने यांची लेखी कबुली
• मग कारवाई का होत नाही ? पप्पू देशमुख यांचा सवाल

चंद्रपूर : २ मार्च २०२१ रोजी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.तात्यासाहेब लहाने यांनी चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अरुण हुमणे यांना लिहिलेले एक पत्र जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या हाती आलेले आहे. संचालक डॉ.लहाने यांनी या पत्रामध्ये अधिष्ठाता डाॅ. हुमणे यांना फटकारले आहे.अनावश्यक पत्रकबाजी मुळे थकीत पगार देण्याच्या प्रकरणाचा निपटारा करण्यास विलंब होत असुन शासन व संचालनालयाच्या वेळेचा अपव्यय होत आहे,त्यामुळे अनावश्यक पत्रव्यवहार टाळा तसेच शासनाची रीतसर पूर्व परवानगी घेतल्यानंतरच शासनाकडे प्रस्ताव सादर करा, असा इशाराच या पत्रामध्ये संचालकांनी अधिष्ठाता डाॅ.हुमणे यांना दिलेला आहे. याच पत्रामध्ये कंत्राटी सेवा पुरविण्याच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याचा उल्लेख संचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी केलेला आहे.

अनियमितता झाल्याचे स्पष्ट असताना संचालक डाॅ.लहाने तत्कालीन भ्रष्ट अधिष्ठाता डाॅ.एस.एस.मोरे यांचे विरूध्द कारवाई का करीत नाही ? चंद्रपूरच्या जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीने कारवाईसाठी तीन वेळा पत्र पाठविल्या नंतरही संचालक डाॅ.लहाने मागील २ वर्षांपासून या भ्रष्टाचाराची उघडपणे पाठराखण का करीत आहेत ? असा सवाल जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केलेला आहे. अधिष्ठाता डाॅ.हुमणे यांच्या अनावश्यक पत्रकबाजी व भोंगळ कारभाराचे अनेक पुरावे असून डेरा आंदोलनाच्या नंतर याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांकडे रितसर तक्रार करणार असल्याची माहिती सुद्धा देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेली आहे.

वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांच्या डेरा आंदोलनाला ४० दिवस पूर्ण झालेले आहेत. या आंदोलनावर तातडीने तोडगा काढण्याचे आदेश स्वतः वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आठवड्याभरापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले असून मंत्रालय स्तरावर याबाबत वेगाने कार्यवाही सुरू झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.
दरम्यान चंद्रपूर येथील ज्येष्ठ व्हॉलिबॉल संघाचे अध्यक्ष प्रदिप जानवे, उपाध्यक्ष श्यामाकांत थेरे, सचिव दिपक जेऊरकर, कोषाध्यक्ष आर.व्हि कापरबोईना उर्फ स्वामीभैय्या, सिद्धार्थ वाघमारे ,संतोष बोरीकर ,दत्ताभाऊ कडूकर, मुन्ना ठाकूर ,अरुण येरावार, अविनाश पवार,राजू चौधरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया जिल्हा प्रमुख नितीन पिंपळशेंडे, पियुष कुंभारे,विदर्भ राज्य युवा आघाडी अध्यक्ष सुदाम राठोड, माहिती अधिकार पत्रकार संघ समिती उपजिल्हाप्रमुख अविनाश ऊके, शहराध्यक्ष योगेश मोहेकर, यांच्या शिष्टमंडळाने डेरा आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला.