◆ चार हजार कोवॅक्सीन लसीचे डोस पुरविणार
चंद्रपूर : श्रद्धेय बाबा आमटे यांनी आनंदवनाची स्थापना केल्यानंतर अनेक संस्थांची हळूहळू उभारणी केली. बाबांनी कुष्ठरोग्यांना कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाबाबत अवगत करण्यासाठी तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना कृषी शिक्षण आणि तंत्रज्ञान विस्तार कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभ व्हावा याकरिता १९६५ मध्ये आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयाला उज्वल यशाची परंपरा लाभलेली आहे. अनेक विद्यार्थी आज चांगल्या हुद्यावर कार्यरत आहे. त्यातीलच एक नाव जे संपूर्ण जगभर चर्चेत आहे ते म्हणजे डॉ. कृष्णा इल्ला यांचं.
हैदराबाद येथील भारत बायोटेक लिमिटेडचे ते व्यवस्थापकीय संचालक आहे आणि याच कंपनीने भारताची पहिली कोवॅक्सीन ही कोरोना वरील लस तयार केली. डॉ. कृष्णा इल्ला हे मूळचे तामिळनाडू जवळील आंध्रप्रदेशातील छोट्याश्या गावातील असुन कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. सध्या ते भारत बायोटेक या संस्थेचे चेयरमन तथा व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत आहेत. कोरोना नामक जागतिक महामारी मुळे गेल्या दोन वर्षांपासून आनंदवन च्या जीवन चक्राला खीळ बसलेली आहे. आनंदवनातील सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे अर्थचक्र थांबले आहे. सोबतच अनेक कार्यकर्ते कोरोनामुळे स्मृतीशेष झाले. ही बाब जेंव्हा आनंदवन परिसरातच कृषीची पदवी घेतलेल्या डॉ. कृष्णा इल्ला यांच्या निदर्शनास संस्थेचे विश्वस्त कौस्तुभ आमटे तथा माजी प्राचार्य डॉ . शेलगावकर यांनी आणुन दिली तेंव्हा तात्काळ त्यांनी जिव्हाळ्यानिशी कृषी महाविद्यालयातील माजी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी कुटुंब, विद्यार्थी आणि आनंदवनातील रहिवासी, रुग्ण यांच्या प्रक्रुती बाबत संवेदनशीलता दाखवीत ४००० लसी मोफत देण्याचे दातृत्व दाखविले आहे.
आनंदवनात या लसींची पहिली खेप पोहचली असून आज पासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. श्रद्धेय बाबा नेहमी म्हणायचे की आनंदवन हे एकलव्य तयार करणार विद्यापीठ आहे. असेच एकलव्य असलेले डॉ. कृष्णा इल्ला यांनी लसींची गुरुदक्षिणा देऊन आनंदवन ला मोलाची मदत केलेली आहे.