शरद पवारांकडून गृहमंत्री अनिल देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न – सुधीर मुनगंटीवार

0
185
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

मुंबई : मुंबईत माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एका पत्राद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राज्यातील विरोधी पक्ष भाजप करत आहे. पण आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांच्या वरती केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत घरी विलगीकरणामध्ये असल्याचा दावा, पवारांनी केला आहे. त्यावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर टीका केली.

अनिल देशमुख यांनी 15 फेब्रुवारीला एक पत्रकार परिषद बोलाविली होती आणि त्याचा दाखला हा त्यांच्याच ट्विटर अकाउंटवरती आहे. त्यामुळे शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाचवण्यासाठी खोटं बोलत आहेत, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, एखाद्या पोलीस विभागाच्या एसपीला लपवण्याचा प्रयत्न करावा अशी ही शरद पवार यांची पत्रकार परिषद होती. 15 फेब्रुवारीला चार वाजून चार मिनिटांचा अनिल देशमुख यांचे ट्विटमध्ये पत्रकार परिषद घेऊन देशमुख भारतरत्न लता मंगेशकर सचिन तेंडुलकर यांच्या विषयी चौकशी करण्याबाबत माहिती देत आहेत. म्हणजेच क्वारंनटाईनमधले अनिल देशमुख आणि पत्रकार परिषदेमध्ये अनिल देशमुख हे वेगळे आहेत का, राष्ट्रवादीने अनिल देशमुख यांचा क्लोनिंग केलेला आहे का, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

शरद पवारांसारखे नेते 15 तारखेला अनिल देशमुखांना कोरोना झाल्याचे सांगतात, तर ताबडतोब अनिल देशमुख यांना अटक करावे लागेल. कारण होम क्वारंनटाईन असणारा व्यक्ती हा पत्रकार परिषद कसा घेऊ शकतो आणि सरकार मधले मंत्रीच हे नियम पायदळी तुडवत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना अटक करण्याचे आदेश दिले पाहिजे. कारण मुख्यमंत्री सातत्याने कोरोना संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करतात. परंतु त्यांच्यात सरकारमधले नेते हे नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे त्यांना अटक करुन जनतेला आदर्श घालून देण्याच्या दृष्टीने कृती केली पाहिजे, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.