कोरपना- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
चंद्रपूर : कोरपना-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पारडी येथील शिव मंदिराजवळ दुचाकींची समोरासमोर भिषण धडक झाल्याने तीन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज बुधवारी (23 जून) ला दुपारी तीन वाजताचे सुमारास घडला. बहादू लच्चू सोयाम (३७) , विश्वास भुतडे (४०) रा. येलापुर व राजू अर्जुन सोलंकी (३४) रा.इदरवेल्लीअसे मृतांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, कोरोना आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकी क्रमांक एम एच ३४ एन ५१३५ ही कोरपनाकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने समोरासमोर जबर धडक दिली. कोरपनाकडे जाणा-या दुचाकीवरील बहादू लच्चू सोयाम (३७) , विश्वास भुतडे (४०) रा. येलापुर व विरूध्द दिशेने येणा-या दुचाकीवरील राजू अर्जुन सोलंकी (३४) रा.इदरवेल्ली असे तिघे जण जागीच ठार झाले. तर मुस्तकीन शेख (१८) रां. इदर वेल्ली हा गंभीर जखमी झाला. येल्लापूर येथील दुचाकीस्वार हे तेलंगणातील बेल्ला येथे जात होते तर दुसर्या दुचाकीवरील दुचाकीस्वार हे कोरपनाकडे येत होते.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेहांना ग्रामीण रुग्णालयात उर्वरित तपासणीसाठी हलविण्यात आले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अरुण गुरनुले यांच्या मार्गदर्शनात सूरू आहे.