आशा सेविकांना मानधनवाढ आणि कोविड भत्ता देण्याचा निर्णय, संप मागे

मुंबई : आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या बेमुदत संप प्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज बुधवारी पुन्हा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आशा स्वयंसेविकांना १ जुलै २०२१ पासून १००० रुपये निश्चित मानधनवाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता देण्याचा निर्णय झाला. आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याने संप मागे घेत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीनंतर जाहीर केले.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या बेमुदत संप प्रकरणी तोडगा काढण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात कामगार संघटनांची बैठक मंगळवारी बोलावली होती. मात्र; चर्चेवेळी कोणताही तोडगा निघाला नव्हता. मात्र, आज बुधवारच्या बैठकीत तोड़गा निघाला. बुधवारी संपाचा ९ वा दिवस होता.

१५ जूनपासून महाराष्ट्रात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक हे संपावर गेले होते. मानधन नको, वेतन द्या, या मूळ व प्रमुख मागणीसह कोरोना काळात प्रतिदिन ५०० रुपये भत्ता देण्याबरोबरच आशा स्वयंसेविका (वर्कर) यांचा शासनाने विमा काढण्याबरोबरच आरोग्य सेवा- सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी करत राज्यातील सुमारे ७२ हजारांहून अधिक आशा व गटप्रवर्तकांनी घरात राहूनच राज्यव्यापी बेमुदत संप सुरू केला होता.

कोरोना महामारीच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून आशा वर्कर्स ग्रामीण भागात कोरोना योद्धा म्हणून कार्य करत आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांना योग्य ते उपचार मिळाले. जिल्हा आरोग्य विभागाची यंत्रणा कुचकामी ठरलेली असताना आशा वर्कर यांनी मोलाचे कार्य केले. आजही ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेची भिस्त सर्व आशा वर्कर्स यांच्यावरच आहे.