चंद्रपूरच्या दारुबंदीतही वसुलीचे “वाझे”

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• व्हिडिओ झाला वायरल; कुणाच्या आशीर्वादाने चाललाय हा खासदारांच्या गृहमतदार संघात गोरखधंदा

• पालकमंत्र्यांच्या मतदार संघातील ती कारवाई कुणाच्या इशा-यावरून?

चंद्रपूर : वरोरा येथील जे.बी. सावजी रेस्टॉरंटमधील एक व्हिडिओ समोर आला असून, जिल्ह्यातील अनेक ढाब्यामध्ये व हॉटेलमध्ये बिअर बारच्या दुप्पट किंमतीत दारू प्रेमींना उघडपणे दारू विक्री केली जात आहे. संबंधित व्हिडिओ बघितल्यानंतर थक्क व्हाल की येथे कशा पद्धतीने बिअरबार प्रमाणे विक्री सुरू आहे.
हे जेबी सावजी रेस्टॉरंट्स खुलेआम दारूची अवैध विक्री करत आहेत. म्हणजेच स्थानिक प्रशासनाने त्यांना परवानगी दिल्याचे उघङ होत आहे, अन्यथा यांची हिमत झाली नसती. ही हिमत लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादातून येत असल्याचेही स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यात दारू बंदीनंतर आजूबाजूच्या जिल्ह्यातून दररोज लाखो रुपयांची दारू पुरविली जात असून, जिल्ह्यातील विविध तहसीलांमध्ये दररोज लाखो दारू पकडण्यात येत आहेत. मात्र तस्करी कमी होण्याऐवजी आणखीनच वाढ होत आहे. दारूबंदीच्या सहा वर्षांत प्रशांत आंबटकर आणि हिंगणघाटचे संदीप धानोरकर आणि अमोल पाटील यांनी संबंधित अधिका-यांना हाताशी धरून पुरवठा सुरू केला आहे. वरोरा येथील या रेस्टॉरंटमध्ये खुलेआम विक्री केले जात आहे, तेव्हा पोलिस व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-याकडून कारवाई न केल्याने त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अंबटकर आणि धानोरकर हे दोघे वर्धाच्या हिंगणघाटात दारूचा पुरवठा करीत असतात. आता चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तहसीलमध्ये पुरवठा करीत आहेत, पोलिसांनी अवैध दारू तस्करीच्या अनेक गुन्ह्यांची नोंद केली असतानाही ही तस्करी थांबलेली नाही. वरोरा येथील हा व्हिडिओ प्राथमिक स्वरूपाचा आहे. चंद्रपूर शहर असो की जिल्ह्यातील कोणतेही शहर. असे एकही ठिकाण नाही की जिथे खुलेआमरित्या बियर बार प्रमाणे दारूची सेवा दिली जात नाही.

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि खासदार हे दारू विक्रीच्या समर्थनात आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात लवकरच दारू सुरू होईल, असे ते उघडपणे सांगतात. त्यासाठी जीवाचे रान करून दारूबंदी हटवण्यासाठी रात्रंदिवस एक करीत आहेत. दारू विक्रीतून मिळणारा महसूल आणि त्यातून होणारी उलाढाल म्हणजे वसुलीचे “वाझे”च होय. याच महिन्याच्या प्रारंभी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा मतदारसंघ असलेल्या ब्रह्मपुरीत काँग्रेसच्या कार्यकर्ता तथा नगरसेवकाच्या घरून शंभर पेट्या दारू पकडण्यात आली. ही दारू पकडण्यासाठी मुंबई तेथून उत्पादन शुल्क विभागाचे खास पथक ब्रह्मपुरी दाखल झाले. याचा अर्थ कोणीतरी विजय वडेट्टीवार यांना टार्गेट करीत आहेत हे स्पष्ट होते. पालकमंत्र्यांसारख्या मोठ्या नेत्याच्या मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन मुंबईचे पथक दारू पकडते, हे मोठ्या राजकीय कटकारस्थानाचा एक भाग असू शकतो अशी चर्चा आता ब्रह्मपुरीत रंगू लागली आहे. त्याच वेळी पालक मंत्री चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदी चा समीक्षा अहवाल शासनाकडे दिल्याचे सांगतात. मात्र, महिनात मुंबई त्यावर कोणतीही साधी चर्चा होऊ शकली नाही, हे विशेष.

सहा महिन्यांनी दारू सुरू होणार, लवकरच बैठक होणार अशा निरर्थक चर्चा वर्षभरापासून रंगत आहेत. मात्र, मुंबईतील विश्वसनीय सूत्रानुसार दारूबंदी हटविण्याची कोणतीही चर्चा मंत्रीमंडळात मिळत नाही. म्हणजे केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांना भ्रमित करण्यासाठी उठवलेल्या अफवाच म्हणाव्या लागतील. या अवैध दारूचा पुरेपूर लाभ राजकीय नेते आणि पोलिस प्रशासन घेत आहे. त्यांच्या आशीर्वादातून अवैध दारू विकणारेही आता मस्तावलेले आहेत. या अवैध दारूच्या विक्रेत्यांकडून वसुली करण्यासाठी खाजगी लोकांचाही आधार घेतला जात आहे. पोलीस प्रशासन महिन्याला हजारो पेठ्या दारू पकडते. मात्र यातील अनेक पिढ्या दारू या राजकीय, सामाजिक आणि पोलिसांशी हीतसंबंध ठेवणाऱ्या लोकांना सायंकाळच्या सुमारास पुरवल्या जात आहेत. दारूचे हे मधुर संबंध आता किती घट्ट झाले आहे की, दारूबंदी उठवायची की अवैध दारूतूनच आपली माया गोळा करायची, असे दोन मतप्रवाह सुरू झाले आहेत. वैद्य दारू पेक्षा अवैध दारूतूनच जास्त फायदा होत असल्याने, शिवाय शासनाला कोणताही महसूल देण्याची गरज नसल्याने जिल्ह्यातील मोठे दारू विक्रेते-नेते दारूबंदी न उठलेली बरी, या पवित्र्यात आहेत. मात्र या वैध-अवैध दारूबंदीच्या राजकारणात सामान्य माणसांचा बळी जात आहे हे विशेष.