महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढल्यामुळे पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याबाबत राज्य सरकारने आज नवीन शासन आदेश काढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत कडक निर्बंध लावण्याच्या निर्णयाला सर्वानुमते संमती देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून राज्यात पुन्हा निर्बंध लागू झाले आहेत.
या आदेशात म्हटलं आहे की, आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची व्याप्ती बदलता तिसऱ्या स्तरावरील निर्बंध महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लागू करण्यात आले आहेत. तिसऱ्या स्तरावरील निर्बंध आणखी कडक करायचे असल्यास स्थानिक प्रशासन त्याबाबत निर्णय घेऊ शकतं. लेव्हल ३ मध्ये अत्यावश्यक दुकानं आणि आस्थापना सर्व दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी आहे. तर अत्यावश्यक नसलेली दुकानं आणि आस्थापनं सोमवार ते शुक्रवार या दिवसांत ४ वाजेपर्यंत खुली ठेवू शकता.
महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा शिरकाव झाल्यामुळे राज्य सरकारने अधिक खबरदारी घेतली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे राज्यात २१ रुग्ण आढळले यातील एका ८० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हे निर्बंध लागू केले आहेत. तिसऱ्या स्तरावरील निर्बंधात रेस्टॉरंट, हॉटेल्स यांना ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी आहे. विकेंड दिवशी हॉटेल सुरू राहणार नाहीत. त्यावेळी होम डिलिव्हरी करण्यास परवानगी असेल.
त्याचसोबत आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करता येईल. जीम, सलून आणि स्पा दुकानं ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. राज्यात गुरुवारी कोविड १९ चे १० हजाराहून अधिक रुग्ण आढळले. डेल्टा प्लसचे २१ रुग्ण असून त्यातील एक दगावला. मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, रत्नागिरी, ठाणे याठिकाणी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.
Levels of restrictions for safe Maharashtra pic.twitter.com/FOAKTSrI9A
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 25, 2021
आदेशात काय म्हटलंय?
जास्तीत जास्त लसीकरणासाठी लोकांमध्ये जगजागृती करणारे उपक्रम हाती घ्या, किमान ७० टक्के लोकसंख्येचे लसीकरण करावं, कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लस उपलब्ध करून द्यावी
टेस्टिंग-ट्रॅकिंग-ट्रिटमेंट या पद्धतीला चालना द्या
कामासाठी सुरक्षित जागा ज्याठिकाणी हेपा फिल्टर्स आणि एक्झॉस्ट फॅनचा वापर करावा जेणेकरून कोरोना व्हायरसचे ड्राप पसरणार नाहीत.
मोठ्या प्रमाणात चाचणी करावी, आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा.
कोविड १९ च्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी कठोर करा
गर्दी, सभा-कार्यक्रम, मेळावे घेण्याचं टाळावं, कन्टेन्मेंट झोन तयार करा, लग्नसमारंभ, रेस्टॉरंट, मॉल्ससारख्या गर्दीच्या ठिकाणी भरारी पथकं नेमून तपासणी करावी. प्रत्येक नागरिकांकडून नियमांचे पालन सक्तीनं करा.