कामगारांचे शोषण थांबविण्यासाठी संघर्ष आवश्यक – ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. निरज खांदेवाले

0
318
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

वि.रा. आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची डेरा आंदोलनास भेट व पाठिंबा

चंद्रपूर : श्रमाचा मोबदला मिळणे हा प्रत्येक कामगारांचा घटनादत्त अधिकार आहे. कोरोना सारख्या आपत्ती मध्ये काम केलेल्या,प्रत्यक्ष रुग्णाजवळ जाऊन व जीवावर उदार होऊन सेवा दिलेल्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोविड योध्या कंत्राटी कामगारांचा पगार थकीत ठेवणे केवळ असंवैधानिक नव्हे तर अमानविय सुद्धा आहे. असे प्रतिपादन विदर्भ राज्य आघाडीचे कार्याध्यक्ष एडवोकेट नीरज खांदेवाले यांनी केले.पुढे ते म्हणाले की शासनाकडूनच कामगारांचे अनेक ठिकाणी शोषण होताना दिसते.कामगारांचे शोषण थांबवायचे असेल तर संघर्ष आवश्यक आहे. रस्त्यावरच्या लढाई सोबत वेळ पडल्यास कायदेशीर लढा देणे यासाठी गरजेचे आहे.

जन विकास कामगार संघाचे नेतृत्वात चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कंत्राटी कामगारांना सात महिन्याच्या थकीत पगार व किमान वेतन देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ फेब्रुवारी २०२१ पासून जन विकास कामगार संघाच्या नेतृत्वात सुरू असलेल्या डेरा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज दिनांक २६ फेब्रुवारी रोजी विदर्भ राज्य आघाडी च्या शिष्टमंडळाने भेट दिली. या शिष्टमंडळात वि.रा.आघाडी चे माजी कार्याध्यक्ष एडवोकेट स्वप्नजीत सन्याल, नागपूर शहर अध्यक्ष सनी तेलंग सुध्दा उपस्थित होते. यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना एडवोकेट संन्याल यांनी जन विकास कामगार संघाने सुरू केलेल्या कामगारांच्या आंदोलनामध्ये विदर्भ राज्य आघाडी खांद्याला खांदा लावून कामगारांच्या हक्कासाठी लढण्यास सदैव तत्पर असल्याची भूमिका व्यक्त केली. वि.रा.आघाडीचे नागपूर शहर अध्यक्ष सनी तेलंग यांनी केवळ कामगारांच्या नव्हे तर जिथे जिथे अन्याय होईल त्या ठिकाणी विदर्भ राज्य आघाडी अन्यायग्रस्त यांच्या सोबत उभी राहील असे प्रतिपादन केले. यानंतर वि.रा.आघाडीचे कार्याध्यक्ष खांदेवाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी डेरा आंदोलनाला पाठिंब्याचे पत्र जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख व आंदोलनकर्त्या कामगारांच्या शिष्टमंडळाला दिले.