विजबिल थकीत : विद्युत वितरण कंपनीने कापले कनेक्शन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

गावात पाण्यासाठी हाहाकार; जनतेत रोष

चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा गावातील नागरिकांना नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची मिळणारी सोय केवळ विज बिल थकीत असल्याने विज वितरण कंपनीचे थकीत बिल न भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे विज मिटर कनेक्शन कापले गेले आहे. यामुळे गावात पिण्याच्या पाण्यासाठी एकच हाहाःकार माजला असून गावातील नागरिक “नळाला नाही पाणी, घागर रिकामी रे गोपाला” असे म्हणत ग्रामपंचायतच्या निष्क्रिय व बेजबाबदार कारभारा विरोधात रोष व्यक्त करीत आहेत. याची गंभीर दखल वेळवा येथील युवा क्रांती च्या युवकांनी घेतली असून थकीत असलेले विज बिल त्वरित भरुन कापलेले विज कनेक्शन ताबडतोब जोडण्यात यावे यासाठी पोंभुर्णा संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी केली आहे.

सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून गावात पिण्याच्या पाण्याचे इतर स्त्रोत उपलब्ध नाहीत त्यामुळे एकमेव सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीतून नळाद्वारे मिळणारे पिण्याचे पाणी नागरिकांना मिळत होते. त्यातही गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याची नागरिकांत मोठी बोंब आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हटलं की, यातून गावातील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून त्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी येथील ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. दोन तिन वर्षापूर्वी गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत शुद्ध पिण्याचे वाटर एटीएम मशीन लावण्यात आले. नागरिकांनी या वाटर एटीएम मधून शुद्ध पाणी मिळते म्हणून ग्रामपंचायत अंतर्गत पैसे भरून वाटर एटीएम सुद्धा काढले. परंतु ही शुद्ध पिण्याच्या पाण्याची वाटर एटीएम मशीन चालू होते न होते तशीच बंद पडली. पैसे भरून काढलेले वाटर एटीएम नागरिकांच्या घरीच पडलेले तशेच पडलेले आहेत.

त्यामुळे वेळवा ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रिय व बेजबाबदार कारभारामुळे येथील नागरिक संतापलेले असून रोष व्यक्त करीत आहेत. यासाठी युवा क्रांती च्या युवकांनी पुढाकार घेऊन गावातील नागरिकांना मुलभूत सुविधा त्वरित उपलब्ध व्हाव्या व पिण्याच्या पाण्याची समस्या तात्काळ सोडवून बंद पडलेले वाटर एटीएम मशीन ताबडतोब सुरु करावे याकरिता संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.