चंद्रपूर : चिमूर येथील पी.डब्ल्यू.डी.कार्यालयासमोर आज रविवारी (27जून) ला सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन इसम ठार झाले असून एक इसम गंभीर जखमी झाला. मृतक व्यक्तिमध्ये इंदिरा नगर, चिमूर निवासी अजय महादेव राऊत वय ४७) व मध्यप्रदेशातील शिवणी जिल्ह्यातील खामखरली निवासी सन्नीराम आरेवा २४ यांचा समावेश असून सिंदेवाही तालुक्यातील नाचणभट्टी निवासी अतुल मधुकर चौधरी (वय २३) हा इसम गंभीर जखमी झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार,अजय राऊत हा व्यवसायाने ठेकेदार असून चिमुरजवळच्या सावरगाव येथे ते मजूर सांगण्यासाठी गेला होता. मावशीकडे जेवण करून ते चिमूरच्या दिशेने दुचाकीने ( मोटारसायकल क्र.- MH- 34, AY- 8708 ) निघाले. चिमुरकडून आर. टी. एम. कॉलेज अगोदरच दोन दुचाकीची समोरासमोरा धडक दिल्याने सन्नीराम आरेवा दुसऱ्या दुचाकीने दारूच्या नशेत व वेगात असल्याने गाडी चालवत असल्याचे ट्रॅफिक पोलिसाच्या लक्षात आले. सन्नीराम च्या गाडीवर अतुल मधुकर चौधरी बसून होता.पोलिसाने सन्नीरामला गाडी थांबाविण्यास सांगितले. पण तो थांबला नाही. उलट गाडीचा वेग वाढवून पी.डब्ल्यू. डी. कार्यालयाच्या दिशेने भरधाव पळाला. त्यामुळे सन्नीरामचे गाडीवरील नियंत्रण सुटले व समोरून येणाऱ्या अजय राऊत यांच्या दुचाकीला सन्नीरामच्या दुचाकीची जोरदार धडक बसली.अजय राऊत रस्त्याच्या कडेला फेकल्या गेले तर सन्नीराम आरेवा व अतुल चौधरी रस्त्यावर पडले.
पोलिसांना घटनेची माहिती कळताच चिमूर पो. स्टे.चे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड व उप पोलीस निरीक्षक अलीम शेख, ट्रॅफिक पोलीसदिलीप वाळवे, अन्य पोलीस कर्मचाऱ्यांसाह घटनास्थळी दाखल झाले. अपघात झालेल्या तिघांनाही पोलिसांनी चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता अजय राऊत व सन्नीराम आरेवा यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. जखमी अतुल चौधरी यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मृतक सन्नीराम हा परप्रांतीय मजूर तर अतुल चौधरी हासुद्धा मजूर असून एका ठेकेदारकडे कामाला असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.