दालमिया सिमेंट कंपनीत उंचावरून पडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीत काम करीत असलेल्या एका कंत्राटी कामगाराचा ऊंचावरून पडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज मंगळवारी (29जून) ला दुपारी 2.30 वाजताच्या दरम्यान घडली. संतोष चव्हाण (वय 28) रा . नांदा फाटा असे मृत कामगाराचे नाव आहे.

कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट प्लांट मध्ये आज दुपारच्या सुमारास संतोष चव्हाण नामक कंत्राटी कामगार उंचांवर काम करीत होता. त्याचा तोल गेल्याने तो अचानक खाली पडला. ही घटना कामगारांच्या लक्षात आल्याने त्याला तात्काळ गडचांदूर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. गडचांदूर येथील दवाखान्यात आणताच क्षणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच दालमिया सिमेंट कंपनीतील सर्व युनियनचे पदाधिकारी पोहोचले असून सोबतच दालमिया कंपनीचे व्यवस्थापन कमीटी सुद्धा रुग्णालयात हजर असल्याची माहिती आहे. मृतकाचा कुटुंबातील एका सदस्याला कंपनीत स्थायी नौकरी व आर्थिक साहाय्य देण्याची मागणी कामगार संघटनेनी केली आहे.