चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राचे 3 कर्मचारी बसणार बेमुदत उपोषणाला

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• अधिकार्‍यांनी दिशाभूल केल्याचा आरोप
• लॉक डाऊनचे खोटे कारण देऊन नोकरीवर घेत नसल्याचा आरोप
• मुंबई मुख्य कार्यालयाचे आदेश पत्र येऊनही टाळाटाळ सुरूच

चंद्रपूर : येथील महाऔष्णिक विज निर्मिती केंद्रात कार्यरत तीन कर्मचार्‍यांना सेवामुक्त करण्यात आले होते मात्र ह्या अन्यायाविरोधात तीनही कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे दाद मागुन आपली बाजु यशस्वीरित्या मांडल्यामुळे अखेर मुंबई स्थित मुख्य कार्यालयाने सदर तीनही कर्मचार्‍यांना अर्ध कुशल कामगार ह्या अधिसंख्य पदावर नोकरीत सामावून घेण्याचे आदेश दिले मात्र येथिल व्यवस्थापनाने आदेशाला केराची टोपली दाखवुन कर्मचार्‍यांना मागील 16 महिन्यांपासून नोकरीत सामावून घेतले नसून व्यवस्थापन जाणुन बुजून वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप सेवामुक्त कर्मचारी विकास सोनकुसरे, हेमंत बोकडे, रमेश सोनकुसरे ह्यांनी केला असुन ह्या अन्यायाविरुद्ध 1 जुलै 2021 पासुन मुख्य अभियंता, महाऔष्णिक विज केंद्र, ऊर्जा भवन चंद्रपूर ह्यांचे कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन मधिल सेवामुक्त कर्मचारी विकास सोनकुसरे, हेमंत बोकडे, रमेश सोनकुसरे या तीन कर्मचाऱ्यांना शासन निर्णय : सामान्य प्रशासन विभाग बीसीसी 2018 / प्र.क्र 308/16 ब दिनांक 19 डिसेंबर 2019 अन्वये 4.2 नुसार सदर शासन निर्णयाची अवमानना करीत मागील १६ महीन्यापासून नियुक्तीपत्र न देता व प्रकरणा बाबत विचारले असता मुंबई कार्यालय तर्फे आदेशास विलंब होत असल्याचे तसेच लॉकडाऊन असल्यामुळे विलंब होत आहे असे कारण सांगण्यात येते.
मात्र संबंधित संघटनेचे पदाधिकारी नंदूरकर व धकाते ह्यांनी मुख्य कार्यालय मुंबई इथे चौकशी केली असता कार्यकारी संचालक (मांस) यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकरणात अडवणूकीचे धोरण अवलंबण्यात येत असल्याचे लक्षात आले आहे.

चंद्रपूर पॉवर स्टेशन मधिल उपवस्थापक वानखेडे यांनी मुख्यालयासंबंधात कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून आलेले नियुक्तीपत्र परत पाठविल्याचे निदर्शनास आले मात्र कर्मचाऱ्यांशी सहानुभूतीपूर्वक बोलून वेळकाढू धोरण अवलंबले आहे.

ह्या कर्मचार्‍यांनी ह्यापूर्वी देखिल उपोषणाला बसण्याची परवानगी मागितली होती मात्र कोरोना संकटाचा हवाला देऊन तसेच नियुक्ती आदेश लवकरात लवकर देण्याचे वारंवार आश्वासन देऊनही अजुन पर्यंत नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाही.

यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असुन त्यांना सुरू असलेला मानसीक त्रास व होणार्‍या अन्यायाविरोधात जोपर्यंत तोडगा काढुन अधिसंख्य पदाचे नियुक्तीपत्र देणार नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण तसेच न्याय हक्काच्या लढाई साठी प्रसंगी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या आंदोलनाला सर्व अन्यायग्रस्त जमाती संघटणांनी पाठिंबा दर्शवला आहे असे संघटनेचे पदाधिकारी मनोहर थकाते, नांदूरकर, विजय बारापात्रे तसेच इतर सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कळविले आहे.