मोहफुल वेचायला गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला ; महिला ठार

0
321
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

मुल तालुक्यातील आगडी जंगलातील घटना

चंद्रपुर : उन्हाळ्याचे दिवस असल्याने कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोहफुल वेचायला जाण्याचा व्यवसाय सध्या ग्रामीण भागात सुरू आहे. आज सकाळी आगडी गावातील जंगलात मोहफुल वेचायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज बुधवारी (31 मार्च 2021) ला मूल तालुक्यातील आगडी येथे घडली आहे. कल्पना नामदेव वाढई (वय 54) असे मृत महिलेचे नाव आहे.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात मोहफुल गोळा करण्याचा व्यवसाय सध्या जोरात सुरू आहे. जंगल भागातील गावात पहाटेपासून गावालगतच्या जंगलात जावून मोहफुल गोळा करतात. त्याला सुकवून ते विकतात. त्यापासून मिळणा-या मोबदल्यातून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. आज बुधवारी मुल तालुक्यातील आगडी येथील महिला कल्पना नामदेव वाढई ही आपल्या आईसोबत आगडीगावाला लागून असलेल्या जंगलात सकाळी मोहफुल वेचायला गेल्या होत्या. मोहफुल रात्रीपासून तर दिवसभर पडत असल्याने आई कौशल्या मांदाळे ही सकाळीच मोहफुल वेचून घरी जेवन करायला आली तर मुलगी कल्पना वाढई जंगलातच नेहमीप्रमाणे थांबली होती. अश्यातच मुलगी बराचवेळ होवूनही घरी न आल्याने आईने घरच्या कुटूंबियांना सांगितले. तेव्हा नातू उमेश वाढई याने एकटाचा जंगलात जाऊन आपल्या आईचा शोध घेतला मात्र ती जंगलात आढळून आली नाही. परत तो गावात आला त्याने काही लोकांना सोबत घेऊन जंगलात शोधाशोध केली असता कक्ष क्रमांक 115 मध्ये आई कल्पना हीचा मृतदेह आढळुन आला. शरीरावरील जखमावरून तिला वाघाने मारल्याचे लक्षात येताच लगेच वनविभागाला कळविण्यात आले.

वनपाल प्रशांत खनके, वनरक्षक राकेश गुरनुले, चिरोली पोलिस चौकीचे पोलिस सिपाई पठाण, पंचायत समिती सदस्य वर्षा लोनबले, दामोधर लेनगुरे व गावकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह जंगलात आढळून आला. शरीरावर वाघाने हल्ला केल्याने जखमा आढळून आल्या. तसेच मृतदेह छिन्नविछीन्न अवस्थेत होते. या घटनेमुळे आगडी जंगलशिवारात दहशत पसरली आहे. मोहफुल वेचायला जाणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. वनविभागाने तातडीने या परिसरातील वाघाचा बंदोबस्त करावा आणि मृतकाच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.