शेतकरी व शेतमजूर नाल्याच्या पुरात वाहून गेले; एक मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू

वणी : तालुक्यातील सोनापूर येथील शेतकरी व शेतमजूर नाल्याच्या पुरात वाहून गेले असून यातील एकाचा मृतदेह काही अंतरावर सापडला आहे तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. ही घटना दि 30 ऑगस्ट च्या रात्रीला घडली.

काल वणी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे परिसरातील नाल्याना पूर पूर आले होते. राजूर कॉलरी ते सोनापूर या मार्गावर असलेला नाला पावसाच्या पाण्याने तुडुंब भरला होता. सोनापूर येथील सतीश मधुकर देठे(४२) व राजेंद्र नामदेव उईके (४१) हे शेतकरी शेत मजूर शेतातुन येत होते.

नाल्याला पूर आल्याने त्या पाण्यातून हे जाण्यासाठी निघाले असता पाण्याच्या प्रवाहात दोघेही वाहून गेले. रात्री दोघे घरी न आल्याने गावातील नागरिकांनी व परिवाराने त्यांचा शोध सुरू केला असता नाल्यात सतीश देठे याचा मृतदेह आढळून आला आहे. तर राजेंद्र उईके याचा शोध सुरू आहे. या बाबत वणी पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी पोहचून पुढील तपास करीत आहे.