चिचपल्लीच्या जंगलात अस्वलाचा ४ गुराख्यांवर हल्ला

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : चिचपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या सातारा तुकुम येथील कक्ष क्रमांक-४३६,कक्ष क्रमांक-४३५ मध्ये जनावरे चरावयासाठी घेऊन गेलेल्या चार गुराख्यांवर घनदाट जंगलात दबा धरुन बसलेल्या अस्वलाने अचानक हल्ला केला. यात चारही गुराखी जखमी झाले आहेत. ही घटना आज शनिवारी (3जुलै) दुपारी 1 वाजताचे सुमारास घडली.

विलास तुकाराम पेंदोर (वय ५४), सीताराम किसन मडावी (वय ५७), प्रफुल रघुनाथ सिडाम ( वय ४५), सर्व मु. सातारा तुकुम, तर रुपेश गजानन कुळमेथे (वय ३२) मु. भानसी(सावली) असे जखमींचे नाव आहेत.
सविस्तर वृत्त असे की, सातारा तुकुम येथील विलास तुकाराम पेंदोर, सीताराम किसन मडावी हे दोघेही कक्ष क्रमांक-४३६ च्या रेगुलर जंगलात गुरे चारण्याकरीता गेले होते. घनदाट जंगलात दबा धरुन बसलेल्या अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले.

तर दुसऱ्या घटनेत सातारा तुकुम येथीलच प्रफुल रघुनाथ सिडाम तर रुपेश गजानन कुळमेथे मु. भानसी ( सावली) हेही दोघे कक्ष क्रमांक-४३५ एफडीसीएमच्या जंगलात गुरे चारण्याकरीता गेले होते. यांच्यावरही या अस्वलाने हल्ला केला. यात दोघेही जखमी झाले. दोन्ही घटनेत चार जण जखमी झाले.

सदर घटनेची माहिती वनविभागास मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी व जखमी पर्यंत पोहचले. चारही जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
गंभीर जखमी विलास तुकाराम पेंदोर यांच्या कुटुंबांना वनविभाग कर्मचारी मडावी यांचे कडून आर्थिक मदत देण्यात आली आहे.तर बाकीच्यांनाही तातडीने मदत देण्यात येणार असल्याचे वनविभागाने कळविले आहे. आजच्या या घटनेने सातारा तुकूम परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने त्वरित अस्वलाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.