सहा कोटी वर्षांपूर्वी लाव्हारसातून निर्मित स्तंभ सापडले

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : सुमारे सहा कोटी वर्षांपूर्वीचे तप्त लाव्हारसापासून निर्माण झालेले दगडी स्तंभ जिल्ह्यातील एका गावात रस्त्याचे खोदकाम सुरू असताना सापडले आहेत. झरी तालुक्यातील शिबला ते पांढरकवडा या रस्त्याच्या रुंदीकरणादरम्यान खोदाई सुरू असताना हे प्राचीन स्तंभ सापडले.

पर्यावरण व भूगर्भशास्त्रज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, यवतमाळ जिल्ह्यातील वणी परिसर भौगोलिकदृष्ट्या खूप प्राचीन आहे. या परिसरात सुमारे सहा कोटी वर्षांपूर्वी लाव्हारसापासून बेसाल्टचे हे स्तंभ तयार झाले आहेत. लाव्हारस थंड होता होता हे षटकोनी आकाराचे खांब तयार झाले.

चोपणे हे केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाच्या प्रादेशिक समितीचे माजी सदस्य आहेत. पांढरकवडा आणि मारेगाव तहसीलजवळ निओप्रोटेझॉईक सहा लाख वर्षे जुने जीवाश्मही आढळतात. याच भागात मला 200 दशलक्ष वर्ष प्राचीन स्ट्रॉमाटोलाइटस् सापडले आहेत, असे त्यांनी सांगितले.

झरी ते पांढरकवडा या मार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. याच मार्गावर शिबला पार्डी या नागमोडी रस्त्याचा डोंगर घाट आहे. घाटामध्ये रस्ता रुंदीकरणासाठी डोंगरात खोदकाम करण्यात येत आहे. हे काम सुरू असताना हे दगडी खांब सापडले. यापूर्वी झरीपासून सहा किलोमीटर अंतर असलेल्या खापरी जंगलात विविध आकाराचे पुरातन दगड सापडले आहेत. मांगली येथे पुरातन मंदिर आहे. आता हे दगड सापडल्याने भूगर्भशास्त्र अभ्यासकांच्यादृष्टीने ते महत्त्वाचे ठरणार आहेत.