कोरोना योद्ध्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी

0
134
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• ७ महिन्यांचा थकीत पगारासाठी सुरू आहे आंदोलन
• वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाची मुजोरी

चंद्रपूर : वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कोव्हिड योध्द्या कामगारांना ७ महिन्यांचा पगार व दोन वर्षांपूर्वी लागू झालेले किमान वेतन देण्यात यावे या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील ५५ दिवसांपासून डेरा आंदोलन सुरू आहे. जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही या कोरोना योद्धांना पगार देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सर्व कंत्राटी कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यापूर्वी प्रदिप खडसे व संगीता पाटील या दोन कामगारांचा थकीत पगार व मानसिक तणावमुळे मृत्यू झालेला आहे.

मात्र पगार देण्याविषयी तातडीने कार्यवाही करण्याऐवजी कामगारांना कामावरून काढण्याची धमकी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने एका नोटीसद्वारे दिलेली आहे. ही नोटीस देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेण्यात आलेला आहे.सुरक्षारक्षक, कक्ष सेवक,सफाई कामगार इत्यादींच्या नावासह एक यादी दिनांक ३ एप्रिल च्या रात्री शासकीय रुग्णालयातील अपघात विभागाच्या बाजूला असलेल्या मेट ऑफीस समोर लावण्यात आली. आंदोलनकर्त्या कामगारांनी २४ तासाच्या आत कामावर रुजू व्हावे अन्यथा त्यांना कामावरून काढण्यात येईल असा धमकीवजा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आलेला आहे.दरम्यान वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या या नोटिस बद्दल जनविकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख तसेच आंदोलनातील कामगारांनी संताप व्यक्त केलेला आहे . जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन पगार देण्याबाबत ठोस निर्णय घेत नाही. मात्र कामगारांना कामावरून काढण्याची धमकी देत आहे.वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाची मुजोरी खपवुन घेणार नाही.त्यांना योग्य भाषेत उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया सुध्दा ‘जनविकास’चे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी दिलेली आहे.