दोन महिन्यांपासून गोरेवाडातील रेस्क्यू सेंटरमध्ये सुरू होता उपचार
चंद्रपुर : दोन महिन्यांपासून गोरेवाडातील रेस्क्यू सेंटरमध्ये उपचार सुरू असलेल्या खली (टी-५०) या वाघाचा अखेर सोमवारी पहाटे मृत्यू झाला. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या या वाघाला गोरेवाडामध्ये अखेरचा निरोप देण्यात आला.
अत्यंत आकर्षक, रुबाबदार आणि धष्टपुष्ट असलेला हा टी-५० वाघ खली नावाने परिचित होता. त्याच्या भक्कम देहयष्टीमुळे पर्यटकांनीच त्याचे हे नामकरण केले होते. ८ मे रोजी मोहर्लीच्या आगरझरी वनपरिक्षेत्रात तो जखमी आणि अत्यंत कमजोर अवस्थेत दिसला होता. त्याची ही अवस्था पाहून ९ मे रोजी ट्रँक्यूलाइज करून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या परवानगीने पुढील उपचारासाठी गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात आले होते. त्याची प्रकृती नाजूक असल्याने पशुवैद्यकीय पथक त्याच्यावर सातत्याने उपचार करीत लक्ष ठेवून होते; मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर सोमवारी पहाटे ३ वाजता त्याचा मृत्यू झाला.
कमरेला होती दुखापत
खलीच्या कमरेच्या हाडाला दुखापत असल्याचे शवविच्छेदनामध्ये आढळले. दोन महिन्यांपूर्वी त्याला एखाद्या वाहनाची धडक बसली असावी, यामुळे मणका तुटल्याने तो पॅरालाइज झाला होता. त्याच्या नेमक्या वयाबद्दल संभ्रम आहे. मात्र दोन्ही सुळे तुटलेले होते, यावरून तो बराच वयस्क असावा, असा अंदाज आहे. अलीकडे त्याच्या आहारात सुधारणा झाली होती. मृत्यूच्या एक दिवसापूर्वीही त्याने चांगला आहार घेतला होता, अशी माहिती आहे.