बांबु तोडण्याकरीता गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रात  आज सकाळी ८ वाजता इसमाचा मृतदेह आढळुन आला. मृतक श्री. भारत रामा बावणे वय ६५ रा. मुधोली हे काल शुक्रवारी रोजी बांबु तोडण्याकरीता मुधोली लगतच्या जंगलात गेले होते. ते दुपारी ३ वाजेपासून दिसत नसल्यामुळे गावकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) मोहर्ली यांचे कार्यालयात रात्री ९ वाजता माहिती दिली.

त्यानुसार रात्रीच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या चमुने शोध मोहिम सुरु केली. त्यांचा मृतदेह आज सकाळी ८ वाजता मोहर्ली वन्यजीव परिक्षेत्रातील आंबेगड नियतक्षेत्रात कक्ष क्रमांक १३८ मध्ये बफर क्षेत्राच्या सिमेपासून अंदाजे ८५ मीटर अंतरावर कोर क्षेत्रात आढळुन आला.

श्री. भारत रामा बावणे यांचा मृत्यु वाघाच्या हल्ल्यात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी प्राथमिक पंचनाम्यानंतर मृतदेह भद्रावती ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदना करीता पाठविला आहे.