• जिल्हा आरोग्य विभागाकडून रामनगर पोलिसात तक्रार दाखल
• बेरोजगारांनी पोलीसांत तक्रार नोंदविण्यास पुढे यावे : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत
चंद्रपूर : अर्थव ॲग्रिक्युअर प्रायव्हेट लिमिटेड, शाखा चंद्रपूर या खाजगी संस्थेकडून चंद्रपूर जिल्ह्यात स्वाईनफ्ल्यू, मलेरिया, डेंग्यु, चिकनगुनिया, जापनिज एन्सेफलायटिस इ. किटकजन्य आजाराचे प्रतिबंधात्मक होमिओपॅथिक औषध वाटप कार्यक्रम व लोकशिक्षणाचा प्रकल्प राबविण्याकरिता झोनल प्रोजेक्ट मॅनेजर, डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट मॅनेजर, ब्लॉक कोऑर्डिनेटर, व्हिलेज कोऑर्डिनेटर इत्यादी पद भरती करिता काही वृत्तपत्र व समाजमाध्यमांमध्ये जाहिरात प्रकाशीत करून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांची भरती करण्यात येत आहे. या जाहिरातीत आयुष मंत्रालय,भारत सरकार असा उल्लेख केलेला आहे. या प्रकल्पास आरोग्य विभागाची कोणतीही परवानगी नाही, त्यामुळे केंद्र सरकारचा कार्यक्रम समजून बेरोजगारांची फसवणूक होण्याची शक्यता आहे,
असा धक्कादायक खुलासा जिल्हा आरोग्य विभागाने केला आहे.
अथर्व वेल्फेअर सोसायटी या लखनौ (उत्तर प्रदेश) येथे मुख्य कार्यालय असलेल्या संस्थे अंतर्गत अथर्व अॅग्रिक्युअर प्रायव्हेट लिमिटेड, शाखा चंद्रपूर या खाजगी संस्थेकडून जिल्ह्यात होमिओपॅथिक औषध वाटप कार्यक्रम व लोकशिक्षणाचा प्रकल्प राबविण्याकरिता आरोग्य विभागाकडे परवानगी मागितलेली आहे. परंतु आरोग्य विभाग, चंद्रपूर कडून त्यांना अशा प्रकारची कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. हा प्रकल्प संपूर्णतः सदर खाजगी संस्थेचा असून ती संस्था याकरिता जबाबदार आहे. संस्थेकडून पदे भरण्याकरिता ईच्छूक उमेदवारांकडून तसेच नोंदणी फी, वर्गणी, देणगीचे नावाखाली जनतेकडून रक्कम उकळल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी औषधे वाटणा-यांना कोणीही पैसे देवू नये. अशा प्रकारे रक्कम मागणारे आढळल्यास आरोग्य विभाग तसेच पोलीस विभागास तात्काळ कळवावे. आरोग्य विभागाकडून याबाबत रामनगर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे वरिल संस्थेकडून आयुष मंत्रालयाचे नावाचा गैरवापर करुन ज्या बेरोजगार युवकांना पैसे घेवून नियुक्ती देण्यात आली, त्यांनी सदर संस्थेविरुध्द पोलीसांत तक्रार नोंदविण्यास पुढे यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासना कडून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी केले आहे.