चंद्रपूर : ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन स्थानिक जनता महाविद्यालयाच्या सभागृहात आज (दि.१९) ला पार पडले.
जनता महाविद्यालय व जनता करीअर लॉन्चर च्या संयुक्त विदयमाने जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या माध्यमातून सदर उपक्रम राबविण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे, डॉ. अनंत हजारे, गोविंदराव थेरे, विलास मांडवकर, डॉ. एम. सुभाष, सुनिल दहेगावकर आदी उपस्थित होते.
कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या काळात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता सामाजिक बांधीलकी जपत सदर रक्तदान शिबिर आयोजित होते. या रक्तदान शिबिरात जवळपास १०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अजितदादा पवार राजकारणातील एक आगळं-वेगळं समीकरण आहे. त्यांच्या चुंबकीय व्यक्तीमत्वाचा सहवास जिवतोडे कुटुंबियांकरीता फार जुना आहे. १९६७ ते १९७२ माझे वडिल दिवंगत शिक्षण महर्षी श्रीहरी जिवतोडे आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत विधानसभेचे प्रतिनिधी होते. माझे लहानबंधू संजयवर अजितदादांचा विशेष स्नेह होता. संजय त्यावेळेला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. चंद्रपूर जिल्हा परिषद सदस्य होते. त्यावेळी अजितदादांचे संजयला नेहमीच मार्गदर्शन मिळायचे. राज्याच्या राजकारणातील भारदस्त व्यक्तीमत्व अजित दादांना वाढदिवसांनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देवून त्यांची राजकीय आणि सामाजिक जीवनात उत्तरोत्तर प्रगती होवो, अशी सदिच्छा डॉ. अशोक जिवतोडे यांनी यावेळी व्यक्त केली.
रक्तदान हेच श्रेष्ठदान असुन भौतिक वस्तुंचे दान करण्यापेक्षा रक्तदान हे कधीही खरे दान होईल, म्हणून जसे जमेल त्या माध्यमातून रक्तदान केले पाहिजे त्याने आपले शरीर देखील सुदृढ राहते, असे विचार डॉ. अशोक जिवतोडे यांनी यावेळी मांडले.
मोठ्या संख्येने नागरीक व रक्तदाते उपस्थित होते.