लेटरबॉम्ब : देशमुख त्या तारखेला मुंबईत नव्हे तर नागपूरला होते

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. परमबीर सिंहांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले असल्याचा खळबळजनक दावा केला. यानंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली होती. आता यावर शरद पवारांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘आरोपांमध्ये तथ्य नाही, यामुळे राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही’ असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवार यांनी यावेळी अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात दाखल असल्याचे आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते क्वारंटाइन असल्याची कागदपत्रंच पत्रकार परिषदेत सादर केली. “अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात ५ ते १५ तारखेपर्यंत कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. १५ फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान नागपुरात राहत्या घरी क्वारंटाईन होते. त्यामुळे परमबीर सिंग यांनी केलेले आरोप आणि वस्तुस्थिती यात खूप फरक आहे. अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात कुणाला भेटण्याची शक्यताच नव्हती हे सिद्ध झालंय”, असं शरद पवार म्हणाले.

आरोपात तथ्य नाही, राजीनाम्याचा प्रश्नच नाही:
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ते म्हणाले की, ‘परमबीर सिंह यांनी जे आरोप केले आहेत. त्या कालावधीत अनिल देशमुख रुग्णालयामध्ये होते. त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये आता तथ्य राहिलेले नाही, अनिल देशमुख या काळात मुंबईत नव्हते, रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

अनिल देशमुख यांच्यावर आरोप करताना परमबीर सिंह यांनी ‘व्हॉट्सअॅप चॅट’चा मजकूर जाहीर केला होता. तसंच, कोणते पोलीस अधिकारी देशमुख यांना कोणत्या दिवशी भेटले याची माहिती देखील दिली होती. सचिन वाझे, संजय पाटील हे अधिकारी गृहमंत्र्यांना भेटल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची जी तारीख त्यांनी नमूद केली आहे, ती संशय निर्माण करणारी असल्याचं मेडिकल रेकॉर्डवरून समोर आलं आहे.

परमबीर सिंह यांच्या म्हणण्यानुसार, अनिल देशमुख यांनी वाझेंना मुंबईतील ‘ज्ञानेश्वरी’ बंगल्यात भेटायला बोलावलं होतं. मात्र, ज्या दिवशी वाझे आणि देशमुख यांची भेट झाल्याचा दावा परमबीर यांनी केला आहे. त्या दिवशी अनिल देशमुख हे मुंबईत नव्हते. ते नागपूरमध्ये होते आणि तिथं कोरोनावर उपचार घेत होते. रुग्णालयाच्या कागदपत्रांतून ते समोर आलं आहे. ‘सीएनएन न्यूज १८’ या इंग्रजी वृत्तवाहिनीनं याच कागदपत्रांच्या आधारे तसा दावा केला आहे.