चंद्रपूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस ; बळीराजा सुखावला

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• गोसेच्या पाण्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
• जिल्ह्यात 31.6 पावसाची नोंद

चंद्रपूर : जिल्ह्यात कालपासून झालेल्या दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यात आज 31.6 पावसाची नोंद करण्यात करण्यात आली आहे तर सर्वात जास्त पाऊस 56.7 मिमी पडल्याची नोंद चिमूर तालुक्यात करण्यात आली आहे. पावसाअभावी बंद होऊ घातलेली रोवणी आता पूर्ण होणार असून भात रोवणीला गती आल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. तर गोसे धरणाचे पाणी जास्त क्षमतेने वैनगंगा नदीला सोडण्यात येणार असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. काल पासुन असलेल्या पावसात कोणतीही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही.

काल बुधवार पासून जिल्हयात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी पावसाचा वेग मंदावलेला दिसून आला. आज जिल्ह्यात 31.6 मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वात दमदार पाऊस चिमूर 56.7 तालुक्यात तर त्यापाठोपाठ नागभीड 49.2, जिवती 45.2, ब्रम्हपुरी 37.5, भद्रावती 34.4, तर चंद्रपूर आणि पोंभूर्णा येथे अनुक्रमे 31.8 व 31.2 पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर सर्वात कमी पावसाची नोंद सावली व राजूरा येथे करण्यात आली आहे. कालपासून सुरू असलेला पाऊस आज गुरूवारी ही काही तालुक्यात सकाळी सुरूच होता. दुपारी बारानंतर बहुतांश ठिकाणी पावसाचा वेग मंदावलेला दिसून आला. समाधान कारक झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. आठवड्यातून पाऊस बेपत्ता झाला होता. दोन दिवसानंतर भात पिकाची रोवणी पावसाअभावी बंद होण्याच्या मार्गावर होती. या पावसामुळे ही आता पूर्ण होणार आहे. तर जिल्ह्यात काही तालुक्यात काशी, सोयाबीन पिकाला फायदा झाला आहे. त्यामुळे शेतकरी सुखावलेला आहे.

नदी काठालरील गावांना सतर्कतेचा इशारा

गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणामधुन सध्या 160 क्युमेक्स सुरू असलेला विसर्ग आज दि. 22/07/2021 दुपारी 14:00 वाजेपर्यंत 500 क्युमेक्स पर्यंत वाढविण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान खात्याने दिनांक 21/07/2021 ते 23/07/2021 दरम्यान पुर्व विदर्भात बहुतांश ठिकाणी विजेच्या कडकडाटीसह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम तथा जास्त प्रमाणात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

धबधब्यावर गेलेल्या युवकाचा वाहून गेल्याने मृत्यू

तेलंगणा राज्यातील आशिफाबाद जवळ तिर्यानी येथील धबधब्यावर गेलेल्या राजुरा तालुक्यातील देवाडा येथील युवकाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. रामकीसन बिजू लोहोबले ( वय 19) असे मृत्यू युवकांचे नाव आहे.
तेलंगणा राज्यातील आशिफाबाद पासून 25 किलोमीटर अंतरात असलेल्या तिर्यानी परिसरातील धबधबा प्रसिद्ध आहे दरवर्षी या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी काल 21 जुलै रोजी बकरी ईद निमित्य सुट्टी असल्याने राजुरा तालुक्यातील देवाडा येथील रामकीसन लोहोबळे,सुरज साधू हरणधारे,राजकुमार छोले,साहिल मेश्राम आणि काही युवक तिर्यानी धबधब्यावर गेले होते. उंचावरून खोल पाण्यात उडी घेतल्याने या युवकांपैकी तिघेजण वाहून गेले सुदैवाने दोघे जण सुखरूप निघालेत परंतु रामकीसन लोहोबळे हा खोल पाण्यात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला.