बछड्यांसहीत वाघिणीला हुसकावून लावण्याच्या प्रयत्नात दोघे जखमी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• नागरिकांनी सावधान राहण्याचे वनविभागाचे आवाहन

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील वनपरिक्षेत्र पळसगांव गावालगत असलेल्या वाघिणीला हुसकावून लावण्याच्या प्रयत्नात वनविभागाच्या कर्मचाऱ्यासह एका इसम असे दोघांना जखमी केल्याची घटना आज (23 जून) ला सकाळी दहाच्या सुमारास पळसगाव येथील तलावालगत असलेल्या हनुमान मंदिराजवळ घडली. काल मंगळवार पासून आज बुधवार सायंकाळ पर्यंत वाघिणीचा बच्छड्यासंह थरथराट नागरिकांना अनुभवता आला. या घटनेने जंगलात वसलेल्या पळसगाव येथे प्रचंड दहशत पसरली आहे. वनरक्षक सुनिल व्यंकटराव गजलवार हा गंभीर जखमी झाला आहे. तर चरण शंकर बन्सोड (60 वर्ष) हा व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे.

घटनेची हकीकत अशी की, ताडोबा बफर झोन अंतर्गत चिमूर तालुक्यात पळसगाव वसले आहे. सदर गावात वाघाचे दर्शन हे नवे नाही. काल मंगळवारी रात्रीच्या सुमारास एका सहा वर्षाच्या वाघिणीसह दोन बछड्यांनी गावात शिरकाव करून सदाशिव मोहूर्ले यांच्या गोठ्यातील एका जनावराला ठार मारले. आणि त्या गोठ्या लगत असलेल्या झाडाझुडपात दबा धरून शिकार केलेले भक्ष्य खाण्यासाठी बस्तान मांडले. आज बुधवारी त्याच घटनास्थळाजवळील तलावाने एक व्यक्ती जात असताना त्याला आपल्या बछड्यांसह एका वाघिणीचे दर्शन झाले. सदर व्यक्तीने ही माहिती वनविभागाला आणि नागरिकांना दिल्याने बघ्यांची एकच गर्दी उसळली.

नागरिक आणि वनविभागाने त्या वाघिणीला बछड्यांसह गावापासून हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी गावतलाव परिसरात प्रचंड गर्दी उसळल्याने वाघिणीला आपला जिवन मुठीत घेवून पळावे लागले तर दुसरीकडे या वाघिणीच्या भितीने नागरिकही सैरावैरा पळत सुटले. वनविभागाचे अधिकारी वाघिणीला यापरिसरातून जंगलात हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत असतानाच विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे वनरक्षक सुनिल व्यंकटराव गजलवार (वय 31)यांचेवर हल्ला केला. ते यात गंभीर जखमी झाले तर चरणदास शंकर बन्सोड (60 वर्ष) या व्यक्तीलाही वाघिणीचा सामना करावा लागल्याने त्याचेवरही हल्ला चढविला. यात दोघेही जखमी झाले असून वनरक्षक यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यांना चिमूर येथील रूग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. किरकोह जखमी व्यक्तीवर स्थानिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
सहा वर्षाच्या वाघिणीसह बछड्यांचा थरथराट आज दिवसभर पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याने भांबावलेल्या वाघिणीला जंगलात हुसकावून लावण्यात वनविभागाला यश आले नाही. दिवसभर अनेक नागरिकांना वाघिणी आणि बछड्यांचे दर्शन दशहतील करता आले. वृत्तलिहिपर्यंत पळसगाव लगत असलेल्या तलावालगत अजूनही वाघिणी आपल्या बछड्यांसह दबा धरून बसलेली आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड दशहत पसरलेली आहे.

दिवसाआड होत आहे वाघांचे दर्शन

ताडोबा बफर झोन मध्ये चिमूर तालुक्यात पळसगाव हे जंगलात वसले आहे. येथे वाघांचे दर्शन हे नवीन बाब नाही. दिवसाआड नागरिकांना वाघ पहायला मिळते. त्यामुळे नागरिकांनार जिव मुठीत धरून जिवन जगावे लागत आहे. पंधरवाड्यापासून वाघिणीची नजर गावातील पाळीव जनावरांवर होती. त्यामुळे ते गावाशेजारीच राहून शिकार साधण्याचा प्रयत्न करीत होते. काल रात्रीला शिकार केल्यानंतर आपले भक्ष्य खाण्यासाठीच वाघिणीने बछड्यांसह गावतलावालगत बस्ताण मांडले होते. यातूनच दिवसभर वाघिणीच्या दहशतीचा थरथराट पहायला मिळाला. वनविभागाने या वाघिणीला जंगलात हुकसकावून लावण्यासाठी नियोजन करण्यास सुरूवात केलेली आहे. परंतु बुधवारी सायंकाळ झाल्याने ते यात यशस्वी होवू शकले नाही. मात्र गावालगत अद्याप दबा धरून बसलेल्या वाघिणीपासून सावध राहण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. वनविभागाचे अधिकारी पळसगाव परिसरात तळ ठोकून बसले आहेत.