“वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो”; भरसभेत विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेवर घणाघात

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोणावळा येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची परिषद दोन दिवसांसाठी भरवण्यात आली होती. या परिषदेची आज सांगता झाली. त्यादरम्यान सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील ओबीसी नेते या परिषदेला उपस्थित होते. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचं नाव न घेता त्यांना खोचक टोला लगावल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी मंत्री विजय वडेट्टीवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकाच व्यासपीठावर उपस्थित असल्याचे दिसून आले. विजय वडेट्टीवार यांनी बोलत असताना वाघ हा आमचाच आहे आणि तो आमच्याच इशाऱ्याने चालतो, असं म्हणत शिवसेनेला नाव न घेता चिमटा काढल्याचं दिसून आलं.

यावेळी वडेट्टीवार यांनी राज्यातील मंत्रिमंडळात असताना देखील मनातील खदखद बोलून दाखवली. आपण ओबीसी आहोत म्हणून आपल्याला कमी दर्जाची मंत्रिपदे मिळतात, असा थेट दावा वडेट्टीवार यांनी बोलण्यातून केल्याचं दिसून आलं. राज्याचा विरोधी पक्ष नेता हे पद आपण सांभाळलं होतं. त्यामुळे सत्ता आली त्यावेळेस महसूल मंत्रिपद मिळेल, असं वाटलं होतं. पण ओबीसी म्हणून मला ओबीसीचं खातं मिळालं, असं वडेट्टीवार यांनी बोलताना म्हटलं आहे.

विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेला चिमटे काढल्याने यावर शिवसेनेकडून नेमकी काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर विजय वडेट्टीवार यांनी मनमोकळं केल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.