निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुनोना जंगलात कारवाई
चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सकाळी जुनोना जंगलात मोठी कारवाई केली. यावेळी ९० देशीदारूच्या पेट्या आणि ट्रक असा एकूण २४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यात ६२ ९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात दारूची मोठी तस्करी होण्याची शक्यता लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात ठिकठिकाणी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
गुरुवारी सकाळी नईम खान पठाण यांना एमएच १० – बीआर ८९७७ क्रमांकाच्या ट्रकमधून दारूची तस्करी केली जात असून, जुनोना जंगलात दारू उतरविली जाणार असल्याची माहिती मिळाली . त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस उपनिरीक्षक नितीन जाधव, राजकुमार देशपांडे, नईम खान पठाण, गणेश भोयर, अमोल धंदरे, नरेश डाहुले, प्रदीप मडावी या पथकाने जुनोना जंगलात छापा टाकला. यावेळी जंगलात रोडच्या कडेला ट्रक आढळून आला.
मात्र, ट्रकचालक तेथे आढळून आला नाही. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता भाजीपाला नेणारे ट्रे आढळून आले. आतमधील विशेष कप्प्यांची पाहणी केली असता तेथे ९३ देशीदारूचे बॉक्स आढळून आले. चालकाविरुद्ध रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला.