हिरापूर वासीयांनी लावले दादांच्या गाडीला रिव्हर्स गियर

0
85

घोडेबाजार हाणून पडण्यासाठी गावकरी एकवटले

ग्रामपंचायत निवडणुकांचे वातावरण तापले होते. राजुरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस, भाजप व शेतकरी संघटना यांच्यात तिहेरी लढत झाली.

१५ जानेवारीला मतदान पार पडले. दरम्यान आदल्या दिवशी १४ जानेवारी रोजी प्रचार थंडवला असताना कोरपना तालुक्यातील आवाळपूर औद्योगिक वसाहतलगत असलेल्या हिरापूर ग्रामपंचायत येथे एका राजकीय पक्षाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व चंद्रपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्षाचे चार चाकी वाहन पोहोचले.

मात्र गावाच्या वेशीवरच हे वाहन गावकऱ्यांनी रोखून धरले. गावाच्या आत प्रवेश करू नये तुमच्या जीवितास काही धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी आम्ही घेणार नाही असे सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये यासाठी हिरापूर ग्राम वासियांनी चांगलीच एकजूट केली होती.

जिल्हाध्यक्षानी गावकऱ्यांना विनवणी करत असे म्हटले की, “माजी सरपंच यांची मला भेट घ्यायची आहे. कृपया मला गावात जाऊ द्यावे.” मात्र नागरिक आपल्या भूमिकांवर ठाम होते. या भागात ग्रामीण जिल्हाध्यक्ष असलेल्या माजी आमदारांनाही मानणारा प्रचंड वर्ग आहे.

माजी आमदार यांना कोणतीही माहिती न देता ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांनी हा दौरा केला असल्याने पक्षाच्या अंतर्गत गोटात देखील नाराजी होती अशी चर्चा आहे.

सरतेशेवटी हिरापूर वासियांच्या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्हाध्यक्ष यांच्यावर नामुष्की ओढवली. त्यांना गाडीचा रिवर्स गेअर टाकावा लागला आणि गावाच्या वेशी वरूनच परत यावे लागले यामुळे परिसरात खमंग चर्चा रंगली आहे.

या हिरापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

जिल्हाध्यक्ष यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना माहिती न देता केलेल्या दौऱ्यामुळे त्या दौऱ्याचे विपरीत परिणाम अनेक ठिकाणी घडल्याचे बोलले जात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या भागात भाजपाचे विधानसभेचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव चर्चेत होते.

मात्र ऐनवेळी त्यांना संधी मिळाली नाही. आता त्यांचे राजुरा विधानसभा क्षेत्रात दौरे वाढले आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी कोणताही घोडाबाजार होऊ नये आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या परवानगीशिवाय नेत्यांनी गावस्तरावर हस्तक्षेप करू नये हा धडा हिरापुर वासियांना देत नेताजींना रिव्हर्स गियर टाकण्यास हिरापुर वसियांनी भाग पाडले.

त्यानंतर गडचांदूर येथील नगरसेवक राम मोरे, नगरसेवक अरविंद डोहे, माजी नगरसेवक निलेश ताजणे हे कार्यकर्ते हिरापूर गावात पोहोचले. तेव्हा त्यांना देखील गावाच्या वेशी वरूनच परतावे लागले.

दरम्यान जिल्हाध्यक्ष यांचीं या क्षेत्रात होणारी जरबरदस्ती व निवडक कार्यकर्त्यांना घेऊन पक्षांतर्गत चालविलेली मनमानी ग्रामीण स्तरावर पक्षात मोठी फूट पाडत असल्याची व दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत हिरापूर वासियांच्या रोषाला जिल्हाध्यक्ष यांना सामोरे जावे लागले असताना त्यांच्यावर आलेल्या नामुष्कीची परिसरात जोरदार चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here