धक्कादायक : पोलिओ लसीऐवजी बालकांना पाजले सॅनिटायझर, 12 बालक रुग्णालयात भरती

0
1462

यवतमाळ : मध्यें पोलिओ डोज ऐवजी बालकांना सॅनिटायझर पाजण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून 12 बालकांची प्रकृती बिघडल्याने त्यांचेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमे अंतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोज पाजण्यात येते. परंतु, रविवार दि. 31 जानेवारी रोजी यवतमाळच्या कापसीकोपरी गावातील बालकांना पोलिओ लसी ऐवजी सॅनिटायझरचे डोज पाजल्या गेल्याचा धक्कादायक तेवढाच गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. रात्रीच्या सुमारास काही बालकांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागल्यानंतर भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथून पोलिओची डोज घेतलेल्या 12 बालकांना यवतमाळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पोलिओ लसीकरण करतेवेळी संशय आल्याने गावच्या सरपंचांनी लस तपासली असता ते सॅनिटायझर असल्याचा प्रकार उघडकीस आला.

यवतमाळ च्या ग्रामीण व शहरी भागात बुथवरून तसेच ट्रांझीट टिम व मोबाईल टिम याद्वारे जिल्ह्यातील सर्व बालकांना पोलिओ लस पाजण्यात आली. सातत्याने हा कार्यक्रम राबविण्यात येत असतानाही हा हलगर्जीपणा झाल्याने पालकांमध्ये भीती निर्माण झाली. बालकांच्या प्रकृतीच्या काळजीने त्यांच्या जीवाची घालमेल सुरू असून जबाबदार यंत्रणेवर कारवाईची मागणी पालकांनी केली तर जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन बालकांच्या प्रकृतीची माहिती घेतली. याप्रकरणी चौकशी करीत असलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी चौकशीत सीएचओ, आशा आणि अंगणवाडी सेविकेवर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले, चौकशीअंती दोषींवर पुढील कारवाई होईल असे त्यांनी सांगितले.

जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व आरोग्य यंत्रणेद्वारे पल्स पोलिओ मोहिमेचा वारंवार आढावा घेतल्या जात असतांनाही भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात संबंधित अधिकारी व कर्मचा-यांनी अक्षम्य असाच हलगर्जीपणा केला. त्यामुळेच दो ‘बुंद जिंदगीके’ अशी पोलिओ मोहीम बालकांच्या जीवासाठी हानीकारक ठरली.