चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रीनफिल्ड विमानतळाला ‘मविआ’ ने लावला ब्रेक

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• भाजपच्या काळात मिळाली होती मंजुरी

चंद्रपूर : जिल्ह्यात विमानतळ काळाची गरज आहे. हीच बाब लक्षात घेऊन तत्कालीन मंत्री आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यासाठी प्रयत्न केले. २०१८ मध्ये राजुरा तालुक्यात मूर्ती येथे ग्रीनफिल्ड विमानतळास मान्यता मिळाली. प्रकल्पासाठी मुनगंटीवार यांनी ४६ कोटींचा निधी मंजूर करून घेतला. माजी आमदार ॲड. संजय धोटे यांनी जमीन संपादनासाठी मूर्ती परिसरात प्रक्रिया सुरू केली. स्थानिक लोकांना विश्वासात घेतले. आपल्या भागाचा विकास होईल या उद्देशाने शेतकऱ्यांनी सहकार्य केले आणि भविष्यात रोजगार निर्मिती आणि उद्योगांना चालना देणाऱ्या प्रकल्पासाठी जमीन संपादनाचे काम वेगाने सुरू झाले.

बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कमही जमा झाली. मात्र, २०१९ च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि राजुरा तालुक्यातील मूर्ती येथे होणाऱ्या ग्रीनफिल्ड विमानतळाच्या प्रकल्पास ब्रेक लागला. राजकीय इच्छाशक्तीअभावी तब्बल दोन वर्षांपासून महत्त्वाकांक्षी विमानतळ प्रकल्प थंडबस्त्यात आहे. या प्रकल्पात कोट्यवधी रुपये गुंतले आहेत. महत्त्वाकांक्षी विमानतळ प्रकल्पामुळे या भागाचा कायापालट होईल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, या आशेवर येथील तरुण एक एक दिवस मोजत आहे.

औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आहेत. आशिया खंडातील सर्वांत मोठे थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपुरात आहे. नैसर्गिक संपत्तीने वेढलेल्या या जिल्ह्यात अनेक प्रकल्प येण्यास इच्छुक आहेत. जिल्ह्यात बारमाही वाहणारी वर्धा, पूर्वेस वाहणारी वैनगंगा या जीवनदायिनी नद्या आहेत. दळणवळणाच्या दृष्टीने रेल्वे जाळे पसरलेले आहे. मात्र, राज्याच्या राजधानीपासून शेवटच्या टोकावर असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात विमानतळाचे स्वप्न साकारण्यासाठी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आणि राजुरा तालुक्यातील मूर्ती परिसरातील जागेची निवड केली.

जिल्ह्यातील औद्योगिक तालुका म्हणून राजुराची ओळख आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यासाठी ३ जानेवारी २०१८ रोजी भारतीय विमान प्राधिकरणामार्फत प्री-फिजिबिलिटी सर्व्हे करण्यात आला. त्यांच्या अहवालानुसार प्राथमिकदृष्ट्या विमानतळासाठी मूर्ती येथील जागा योग्य आहे. दोन टप्प्यात विमानतळाची उभारणी करावी, असे प्राधिकरणाने नमूद केले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने प्रस्तावित विमानतळासाठी ८४० एकर जमीन गरजेची असल्याचे जिल्हा प्रशासनास कळविले. त्याअनुषंगाने जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली.

कोट्यवधी खर्चले; पण काम रखडले

२१ डिसेंबर २०१८ च्या परिपत्रकानुसार चंद्रपूर विमानतळाच्या विकासकामांना मान्यता देत असताना जमीन संपादनासाठी सुधारित क्षेत्र आखण्यात आले. यात पहिल्या टप्प्यात राजुरा तालुक्यातील मूर्ती आणि विहीरगाव शेत शिवारातील खासगी, शासकीय ७२० एकर जमीन संपादित करण्याबाबत निर्देश देण्यात आले. त्यासाठी ४६ कोटींचा निधी मंजूर झाला. मूर्ती येथील ग्रीनफिल्ड विमानतळासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. जिल्ह्यात प्रथमच कार्गो हब तयार होत असल्याने नवीन प्रकल्पांना चालना मिळेल आणि रोजगार उपलब्ध होईल, अशी आशा स्थानिकांना होती. मात्र २०१९ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रात सत्तांतर झाले. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे राज्य शासनाचे लक्षच गेले नाही. कोट्यवधी रुपये खर्चून जमीन संपादनाची प्रक्रिया झाली. मात्र दोन वर्षात कुठलीच प्रगती झालेली नाही. १ डिसेंबर २०२० रोजी मुख्य सचिव यांना दिलेल्या पत्रानुसार विमानतळाच्या उभारणीसाठी पहिल्या टप्प्यात संपादित केलेल्या जमिनीचा ताबा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला मिळालेला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामांना गती देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वासाठी राजकीय प्रयत्न सुरू आहेत.

विमानतळ प्रकल्पातील अडथळे

वन्यजीव संस्थेच्या अहवालानुसार मूर्ती येथील विमानतळाचा परिसर वन्यजीवांचा भ्रमण मार्ग म्हणून दाखविला आहे. त्यामुळे वनविभागाकडून अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. विमानतळामुळे जिल्ह्याच्या विकासास चालना मिळेल, हा दृष्टिकोन ठेवून राजकीय नेतृत्वाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी विमानतळ प्रकल्प थंडबस्त्यात आहे.

विमानतळाला आमचा विरोध नाही. विमानतळ झाले पाहिजे. मात्र, आमचे प्राधान्य शेतकऱ्यांच्या सिंचनला आहे. शेतकरी स्वावलंबी झाला तर या भागाचा नक्कीच विकास होईल. यादृष्टीने शेतकऱ्यांच्या सिंचनाला प्राधान्य आहे. विमानतळाच्या दृष्टीने येणाऱ्या त्रुटीची पूर्तता जिल्हा प्रशासनाने केली पाहिजे.
सुभाष धोटे, आमदार

विमानतळ प्रवासाच्या इच्छापूर्तीसाठी निर्माण केले जात नाही. भारतात ७० टक्के डिफेन्स इक्युपमेंट आयात हाेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात हळूहळू झिरो टक्के डिफेन्स इक्युपमेंट आयात करण्याचे लक्ष्य आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात नवीन उद्योग येतील. राजुरा, चंद्रपूरचा भाग काॅटन क्‍लस्टर असल्याने मोठ्या गुंतवणुकीला वाव आहे. या हेतूने विमानतळ निर्मितीला प्रारंभ केला. नागरिकांचेही अतिशय चांगले सहकार्य मिळाले. विमानतळासाठी अतिशय योग्य जागा निवडली. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात खनिज किंवा उद्योग नसताना विमानतळ बांधण्यात आले मग औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक महसूल देणाऱ्या चंद्रपुरात का नाही. जिल्ह्यात विमानतळ करणे हे माझे ध्येय आहे.
सुधीर मुनगंटीवार, माजी पालकमंत्री, चंद्रपूर

ग्रीनफिल्ड विमानतळाची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र, महाविकास आघाडी सरकारचे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे दुर्लक्ष आहे. प्रकल्प राजुरा तालुक्यात आल्यास नवीन उद्योग येतील. टाटा उद्योग समूहासारख्या मोठ्या कंपन्या हजारो कोटी रुपये गुंतवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांना परिसरात धावपट्टीची गरज आहे. भविष्यातील विकासाचे वेध घेऊन तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल, क्षेत्राचा विकास होईल या दृष्टीने मूर्ती येथील ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पाबाबत पाठपुरावा सुरू आहे. विमानतळासाठी शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे.
ॲड. संजय धाेटे, माजी आमदार, राजुरा