चंद्रपूर : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील ७ वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रिम महागाईविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार असून शुक्रवारी दिनांक ९ जुलै रोजी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सवालाखे, आमदार प्रणिती शिंदे, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनात व महाराष्ट्र महिला प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतुत्वात जन आंदोलन करुन मा. अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी महिला प्रदेश सचिव नम्रता आचार्य – ठेमस्कर, महिला ग्रामीण अध्यक्ष चित्राताई डांगे, महिला शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, चंद्रपूर शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, नगरसेविका सुनीता लोढीया, स्वाती त्रिवेदी, मीनाक्षी गुजरकर, लता बारापात्रे, शीतल कातकर, वाणी दरला, हर्षा चांदेकर, सुनीता धोटे, बोर्डा सरपंच यशोदा खामनकर, वरोरा महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष रत्नमाला अहिरकर, प्रिया भोयर, प्रतिमा कातकर, प्रतिभा जीवतोडे, भाग्यश्री इंगळे, गोपिका परचाके, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, मोहन डोंगरे, कुणाल चहारे, पितांबर कश्यप यांची उपस्थिती होती.
उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून देशातील गरिब जनतेच्या घरी मोफत गॅस देण्याच्या नावाखाली मोदींनी त्यांची फसवणूक केली आहे. गॅस कनेक्शन देऊन त्यांचे रॉकेल बंद केले आणि आता ८५० रुपयांचे गॅस सिलिंडर घेणे या गरिब कुटुंबांना परवडत नाही. मोदी सरकार शेजारच्या नेपाळ, भुतान, बांग्लादेशाला पेट्रोल ३० रुपये लिटर व डिझेल २२ रुपये लिटरने देते आणि आपल्या नागरिकांना मात्र त्याच पेट्रोल डिझेलसाठी १०४ रुपये मोजावे लागतात. मोदी सरकारने केलेल्या या कृत्रिम महागाईने वाहतुकीसह इतर वस्तुंचीही महागाई झाली आहे. सामान्य माणसाचे जगणे कठीण करुन ठेवले असून त्याच्या विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून या जुलमी, अत्याचारी सरकारचा विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात निषेध करण्यात आला.