
• येनबोथला येथे महाशिवरात्री दरम्यानची घटना
चंद्रपूर : गोंडपिपरी तालूक्यातील येनबोथला येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने नदी स्थळी देव-दर्शनासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरूवारी (११ मार्च २०२१) ला घडली. रोहित जोगेश्वर देठे असे मृत युवकाचे नाव असून तो गोंडपिपरी येथील रहिवासी आहे.
कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता प्रशासनाने विदर्भाची काशी म्हणून ओळख असणाऱ्या मार्कंडा (देव), चपराळा, कुलथा या प्रसिद्ध स्थळी महाशिवरात्री दरम्यान भरणा-या यात्रा रद्द केल्या आहेत. त्यामुळे आज गुरूवारी गोंडपिपरी तालुक्यातील येनबोथला येथे परीसरातील भाविकांनी नदी काठावरील देवदर्शन तसेच पूजा अर्चना- करण्याकरिता उपस्थित लावली होती.
गोंडपीपरी येथील रोहित जोगेश्वर देठे हा आपल्या मित्रांसह देवदर्शनासाठी याच ठिकाणी आला होता.
दरम्यान त्याने देवदर्शन घेतल्यानंतर तो युवक नदीमध्ये स्नान करण्यासाठी उतरला. त्याला खोलगट भागातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल नदीत बुडाला.
नदीत स्नान करीत असलेल्या काही भाविकांपुढेच घटना घडल्याने लगेच काही भाविकांनी त्याला नदीतून वाचविण्याचा प्रयत्न करीत त्याला पाण्याबाहेर काढले. तद्नंतर त्याला ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरीला नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले .