“तुमच्या विश्वगुरु बनण्याच्या मोहापायी जनता फकीर बनत चाललीय”

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोक त्रस्त आहेत. कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. यावरून विरोधी पक्षांनी अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार रूपाली चाकणकर यांनी नरेंद्र मोदींना टोला हाणला आहे.

विविध जागतिक विक्रम रचण्याचा मोह असलेले आपले पंतप्रधान आता पेट्रोल डिझेलच्या किमतीबाबत जागतिक विक्रम रचत आहेत. पण सन्माननीय पंतप्रधान, तुमच्या विश्वगुरु बनण्याच्या मोहापायी जनता फकीर बनत चाललीय त्याचं काय???, असा खोचक सवाल करत रूपाली चाकणकर यांनी मोदींना टोला हाणला आहे. त्यासोबतच त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीका केली आहे.

ज्याला लोक “रामराज्य” समजतात ते खरं तर “रामभरोसे” राज्य आहे. रामभरोसे राज्यात असलेल्या आंधळ्या सरकारमुळे तिथे कायदा आणि सुव्यवस्था नावालाही शिल्लक नाही. सीतेची ही हतबलता तिथे रोजचीच असल्याचं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. तर याआधी काँग्रेसमुळे इंधनांच्या किंमतीत वाढ झाल्याचं माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, काँग्रेसने 2014 पूर्वी ऑईल बाँडच्या रुपाने आमच्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज सोडलं, त्यामुळे आता आपल्याला मूळ रक्कम आणि व्याज भरावं लागणार आहे. हे तेलाच्या किंमतीतील वाढीचं एक प्रमुख कारण असल्याचं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं होतं.