वाहन क्र. 1111 म्हणजे तिन पदाधिकारी व एक अधिकारी नंबर 1 चे भ्रष्टाचारी असल्याचे प्रतिक

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

महापौर यांच्यावर नगरसेवक पप्पू देशमुख यांची बोचरी टिका

चंद्रपुर : कोरोना महामारीच्या काळात मनपा मध्ये किमान चार व्हेंटिलेटर ॲम्बुलन्स ची गरज होती.शहरातील हजारो रुग्णांना खाजगी व्हेंटिलेटर ॲम्बुलन्स साठी हजारो रुपये मोजावे लागले.तसेच वेळेवर ऍम्ब्युलन्स उपलब्ध होऊ न शकल्याने अनेकांवर जीव गमावण्याची वेळ आली. मात्र अशा बिकट परिस्थितीत एकही व्हेंटिलेटर ॲम्बुलन्स महानगरपालिकेतर्फे घेण्यात आली नाही. मागील पंधरा महिन्यापासून 19 लक्ष रूपये किमंतीच्या व्हेंटिलेटर ॲम्बुलन्सचा प्रस्ताव धूळ खात पडलेला आहे. परंतु ॲम्बुलन्स घेण्याची संवेदनशीलता मनपा चे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी दाखवली नाही. 30 ते 35 हजार रुपये किमतीचे ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मनपातर्फे रुग्णांना उपलब्ध करून दिले असते तरी शेकडो रुग्णांचे ऑक्सिजन अभावी गेलेले जीव वाचवणे शक्य झाले असते. निधीचे कारण सांगून या सर्व गोष्टी घेण्याचे मनपाने टाळले.

मात्र दुसरीकडे आपल्या खोट्या प्रतिष्ठेसाठी चार वेळा 1 आकडा असलेला वाहन क्रमांक 1111 मिळविण्यासाठी महापौर राखी कंचर्लावार यांनी एआरटीओ कार्यालयात मनपाच्या तिजोरीतून 70 हजार रुपये खर्च केले.
डब्बा घोटाळा,भोजन पुरवठा घोटाळा, कचरा संकलनाच्या कामातील भ्रष्टाचार, प्रसिद्धीच्या कामातील भ्रष्टाचार, टॅक्स मूल्यांकनाच्या कामातील भ्रष्टाचार असे एकापेक्षा एक मोठे भ्रष्टाचार महानगरपालिकेतील तीन पदाधिकारी व एक अधिकारी यांनी केलेले आहे. भ्रष्टाचार व जनतेच्या पैशाची लूट करण्यात मनपातील तीन पदाधिकारी व एक अधिकारी यांनी 1 क्रमांक गाठलेला आहे.

संपूर्ण राज्यातील कोणत्याही महानगरपालिकेमध्ये एवढ्या कमी कालावधीत भ्रष्टाचाराची इतकी प्रकरणे उघडकीस आलेली नाहीत. कदाचित पदाधिकारी व अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचाराचे प्रतिक म्हणूनच महापौर राखी कंचर्लावार यांनी मनपाच्या निधीतून 70 हजार रूपये खर्च करून चार वेळा 1 आकडा असलेला व्हिआयपी वाहन क्रमांक घेतला असावा, अशी बोचरी टिका शहर विकास आघाडीचे गटनेते नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलेली आहे.