माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचा आणखी एक धक्का!

अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केल्यानंतर ईडीने आज अनिल देशमुख यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी छापे टाकले. ईडीने अनिल देशमुख यांचे काम पाहणारे त्यांचे दिवाणजी पंकज देशमुख यांनाही ताब्यात घेतलं.

आज सकाळी ईडीची दोन पथके अनिल देशमुख यांच्या नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथील निवास्थानांवर दाखल झाली. वडविहिरा हे देशमुख यांचं मूळ गाव आहे. तिथे त्याची वडीलोपार्जित शेती आहे. छापे टाकल्यानंतर अधिक तपासासाठी ईडीच्या पथकाने देशमुख यांचे दिवाणजी पंकज देशमुख यांना ताब्यात घेतलं.

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने जप्त केली होती. त्यामुळे देशमुखांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती.

ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेत मुंबईतील वरळी येथील 1 कोटी 54 लाखांचा निवासी फ्लॅट, रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुतूम गावातील 25 प्लॉट्सचा समावेश आहे. ईडीच्या या कारवाईनंतर अनिल देशमुख यांचे समर्थक संतप्त झाले असून, सुडबुद्धीने ही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.