• अज्ञात दुचाकीस्वार आरोपी पसार
• सिंदेवाही तलुक्यातील पेट्रोल पंपावरील घटना
चंद्रपुर : सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राजोली जवळील शुभम् पेट्रोल पंपावर काल सोमवार रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात दुचाकी स्वार दरोडेखोरांनी गावठी पिस्तुलचा धाक दाखवीत सुमारे पावने दोन लाख रुपये लुटून नेल्याची घटना घडली. अज्ञात आरोपी पसार झाले आहेत.
मूल तालुक्यातील राजोली येथील विनोद मुसली यांचे मालकीचे राजोली जवळ पेट्रोल पंप आहे. रात्री साडेसातच्या सुमारास दरम्यान दोन युवक पल्सर या दुचाकी वाहनावर बसून पेट्रोल पंपावर आले. पेट्रोल पंपाचा नोकर कुणाल डोंगरे यांला बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील रोकड हस्तगत करून त्याच नोकराला दुचाकीवर जबरदस्तीने बसविले व विरव्हा गावाजवळील मंदीराजवळ सोडले आणि पैसे घेऊन पसार झाले.
सदर घटनेची माहिती सिंदेवाही पोलिसांना देण्यात आली. सिंदेवाही पोलीसांनी ५ टीम रवाना करीत नाकाबंदी केली. संपुर्ण जिल्हयातही रात्रौच्या सुमारास नाकाबंदी करण्यात आली होती. त्यावेळी नवरगाव – चिमूर मुख्य मार्गावरील इंदीरानगर परिसरात पल्सर दुचाकी पडलेल्या अवस्थेत आढळून आली. मात्र अज्ञात आरोपीचा थांगपत्ता लागला नाही. सिंदेवाही पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून मागील काही दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात अपराधाचे प्रमाण वाढत असून शांत असलेल्या जिल्ह्यात अशांतता पसरल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.