दारू दुकानांच्या NOC साठी विशेष सभा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात असलेल्या गडचांदूर नगर परिषदेने मंगळवारी एकच विशेष समिती सभेचे आयोजन केले आहे. महत्त्वाचे म्हणजे गडचांदूर शहराच्या विकासासाठी गडचांदुर नगर परिषद एवढी कधीच गंभीर राहिली नाही. मंगळवारी बोलविण्यात आलेली विशेष सभा दारू आणि बारच्या एनओसीसाठी आयोजित केल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे.

विशेष सभेत पाच विषय घेण्यात आले आहे. मात्र, त्यातील दोन विषयांची चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे. एका देशी दारूचे दुकान हे गडचांदूर शहरात स्थलांतरित व्हावे, तर दुसरा मुद्दा म्हणजे आदिती वाईन बार ॲण्ड रेस्टॉरंटला परवानगी देण्यासंदर्भातील आहे.

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही विषयाच्या परवान्याला ना हरकत देण्यासाठीच ही सभा बोलविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वॉर्ड क्रमांक तीनमधील प्रभाग चार नवीन आदिती वाईन बार अँण्ड रेस्टॉरंटला नाहरकत मिळावी यासाठी या विशेष सभेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

नवीन बार बाबत एन – ए व बाकी कागदपत्रे ही अपुरी असूनही या बारचा नाहरकतीचा विषय या सभेत चर्चिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गडचांदूर शहरात दहा वाइन बार, चार देशी दारूची दुकाने आहेत.

शहरातील प्रदूषणावर मात करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी एवढे प्रयत्न कधीच केले नाही तेवढे आज दारू दुकानांसाठी सुरू आहेत. सत्ताधाऱ्यांची धडपड ही चिंतेची बाब असल्याचे विरोधी पक्षाचे मत आहे.