चंद्रपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• भाजप आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये झोंबाझोंबी
• नगरसेवकाने टेबल ठोकला तर महापौरांनी नेमप्लेट भिरकावली

चंद्रपूर : जनतेतून निवडून आल्यावर विकासकामांसाठी कधी न भांडणारे नगरसेवक आज चंद्रपूर मनपाच्या सभागृहात सर्वसाधारण सभेत फ्री स्टाईलवर उतरले. इतकेच नव्हे तर कांग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांनी महापौर राखी कंचर्लावार यांच्या समोरील टेबल ठोकला, त्यानंतर चक्क महापौर कंचर्लावार यांनी स्वतःची नेमप्लेट नागरकर यांच्यावर फेकली.

चंद्रपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज गुरूवारी (29 फेब्रुवारी) ला अभूतपूर्व गोंधळ बघायला मिळाला. भाजप आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये झोम्बझोम्बी आणि शिवीगाळ झाली. यामुळं ही आमसभा गुंडाळावी लागली. सभेची सुरुवात होताच मनसे सदस्य सचिन भोयर यांनी रस्त्याची समस्या मांडण्यासाठी अंगावर चिखल घेत सभागृहात प्रवेश केला. पाठोपाठ काँग्रेस सदस्य आले. लेखापरीक्षण अहवालातील 200 कोटींचा अपहार, वीज केंद्रातील दोन संचांचा मालमत्ता कर न घेणे आणि डॉ. मंगेश गुलवाडे यांनी कोविड हॉस्पीटलच्या नावाखाली केलेली रुग्णांची लूट, हे विषय घेऊन काँग्रेस सदस्य महापौरांच्या समोर आले. हातात निषेधाचा फलक झळकावत हे सदस्य घोषणाबाजी करीत असतानाच महापौर राखी कंर्चालावार यांनी या सदस्यांवर नेमप्लेट भिरकावली.

त्यानंतर शाब्दिक युद्ध सुरू झाल्यावर स्थायी समिती सभापती रवी आसवानी हे खाली उतरले आणि काँग्रेस नगरसेवक नंदू नगरकर यांच्याशी भिडले. दोघात धक्काबुक्की झाली. प्रकरण तापत असल्याचं लक्षात येताच आयुक्त राजेश मोहिते आणि उपस्थित सदस्यांनी दोघांना वेगळं केलं. यावेळी शिवीगाळ झाल्याचंही या चित्रीकरणात ऐकायला येत आहे. शेवटी या गोंधळातच सभा तहकूब करण्यात आली. सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी बहुमताच्या जोरावर विरोधकांची मुस्कटदाबी करीत असून, प्रश्नही मांडू दिले जात नसल्याचा आरोप काँग्रेसनं केला.

दरम्यान आज घडलेल्या प्रकारासाठी विरोधकांची कृती कारणीभूत असल्याचा प्रतिहल्ला महापौरांनी केला. काँग्रेस सदस्याने महापौरांचा टेबल ठोकला. हे कृत्य महापौर आणि सभागृहाचा अवमान करणारे आहे. त्यामुळं त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांना दिल्याची माहिती महापौरांनी दिली.
महापौर राखी कंचर्लावार यांनी सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी व कोरोना नियमांना पायदळी तुडविल्याबद्दल कायदेशीर कारवाई करावी यासाठी लेखी तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली.
कोविड नियम लागू असल्याने सध्या मनपाची आमसभा ऑनलाइन प्रक्रियेद्वारे होत आहे, मात्र काही नगरसेवकांनी तब्बल 4 वर्षानंतर रस्त्यावरील खड्डयांसंदर्भात आंदोलन करीत कार्यकर्त्यांसाहित पालिकेच्या आवारात शिरत गर्दी केली.
आज झालेल्या या गोंधळामुळे शहरात होणारा “विकास” सुद्धा आश्चर्यचकित झाला असेलच, कांग्रेस नगरसेवक नंदू नागरकर यांचेवर निलंबनाची कार्यवाही होण्याची शक्यता वाढली आहे.

आमसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी (२९ जुलै) दुपारी एक वाजता सर्वसाधारण आमसभा सुरु असताना विना परवानगी प्रवेश करत सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी नगरसेवक नंदू नागरकर यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम महापालिकेचे कामकाज चे प्रकरण मधील २ (१) नुसार निलंबित करण्यात येत आहे, असे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले.

मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात सर्वसाधारण आमसभा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास खात्याने दिलेल्या कोविड-१९ च्या निर्देशान्वये सदर आमसभा पदाधिकारी आणि गटनेते वगळता उर्वरित सर्व नगरसेवकांसाठी आभासी माध्यमातून घेण्यात आली.
यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल, उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे यांच्यासह सभागृह नेता, विरोधी पक्षनेते, सर्व गटनेते यांची उपस्थिती होती.

सभागृहात कामकाजाला सुरुवात होत असताना नगरसेवक सचिन भोयर यांनी आपल्या २० ते २५ कार्यकर्त्यासह कोणतीही पूर्वसूचना न देता सभागृहात प्रवेश केला. तसेच त्यानंतर नगरसेवक नंदू नागरकर यांनीही काॅग्रेसचे नगरसेवक सुनिता लोढिया, संगीता भोयर, विना खनके, ललिता रेवेल्लीवार, अली अमजद मंसूर, निलेश खोब्रागङे, सकिना अंसारी व इतर कार्यकर्त्यासमवेत सभागृहात प्रवेश करत घोषणाबाजी करून गदारोळ केला. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम महानगरपालिकेचे कामकाजाचे प्रकरण मधील २ (१) नुसार नगरसेवक नंदू नागरकर यांची वर्तणूक गैरशिस्तीची असल्यामुळे सभेतून ताबडतोब निघून जाण्यासाठी निर्देश दिले. परंतु, त्यांनी त्याचे पालन केले नाही. त्यांची सभागृहांमध्ये गैरवर्तणूक सुरूच होती. तसेच त्यांनी महापौरांच्या व्यासपीठावर जोराने हात आपटले. त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा महासभेमधून निघून जाण्याकरिता आदेश देण्यात आले. परंतु नंदू नागरकर महानगरपालिका सदस्य हे सभागृहाबाहेर न जाता तिथेच गोंधळ घालत होते. सबब महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम महानगरपालिकेचे कामकाजाचे प्रकरण २(२) नुसार निलंबित करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन नगर विकास यांचे पत्र दिनांक ३/७/२०२० नुसार ऑनलाइन सर्वसाधारण सभा घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार महानगरपालिका महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभा सुरू असतानाच सुनिता लोढिया, संगीता भोयर, विना खनके, ललिता रेवेल्लीवार, अली अमजद मंसूर, निलेश खोब्रागङे, सकिना अंसारी आदी नगरसेवक विनापरवानगी उपस्थित झाले. त्यामुळे आयुक्त यांनी या सदस्यांवर कोविड नियमानुसार शिस्तभंग केल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी सूचना महापौरांनी दिली आहे.

महानगरपालिका सभेमध्ये नगरसेवक सचिन भोयर यांनी महानगरपालिका सभागृहात विनापरवानगी आणलेल्या नागरिकांवर विनापरवानगी जबरदस्ती प्रवेश करणे व कोविड नियमांचा भंग केल्याप्रकरणी आयुक्त यांनी संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, असेही निर्देश महापौरांनी दिले आहेत.