एकाच रात्री बिबट्याने केली १२ बकऱ्यांची शिकार

• सुमारे अडीच लाखाचे शेतक-याचे नुकसान
• गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

चंद्रपूर : एकाच रात्री बिबट्याने गोठ्यात बांधून असलेल्या तब्बल डझनभर बक-यांची शिकार केल्याची घटना आज सकाळी गुरूवारी (1 जूलै)ला उघडकीस आली आहे. ही घटना चिमूर तालुक्यातील तळोधी नाईक येथे घडली. या घटनेमुळे सुमारे अडीच लाखाचे शेतक-याचे नुकसान झाले आहे.

चिमूरपासून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या तळोधी नाईक येथे प्रवीण जांभूळे या शेतकऱ्याने तळोधी नाईक ते किटाळी रोडवर गावाच्या बाहेर गोठा तयार केला आहे. या गोठ्यात त्यांच्याकडे असलेल्या तब्बल एक डझन बक-या तो नेहमी बांधून ठेवत होत्या. शेतीला पुरक म्हणून तो शेळ्यांचा पालन पोषण करीत होता. काल बुधवारी नेहमी प्रमाणे त्याने बक-या चारून आणल्यानंतर सायंकाळी गावाबाहेर गोठ्यात बक-या बांधून ठेवल्या होत्या.

या गावाला लागूनच ताडोबा जंगल आहे. त्यामुळे या परिसरात हिंस्र प्राण्यांचा वावर आहे. काल रात्री अचानकपणे बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून बांधून ठेवलेल्या तब्बल १२ बकऱ्यांची शिकार केली. आज सकाळी सदर शेतकरी नेहमी प्रमाणे बक-या सोडण्यासाठी गेला असता पूर्ण बिबट्याच्या हल्यात मारल्या गेल्याचे लक्षात आले.

सदर घटनेची वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन बक-यांचा पंचनामा करून चौकशी सुरू केली आहे. सदर शेतक-याला आर्थिक मदत देऊन वाघाच्या बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.