तीन वर्षानंतर फरार पतसंस्थेच्या व्यवस्थापकास अटक

• स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ब्रह्मपूरीतून घेतले ताब्यात

चंद्रपूर : पतसंस्थेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांची सुमारे ३० लाखांची फसवणूक केल्याचे प्रकरण चंद्रपुरात २०१८ मध्ये उघडकीस आहे. त्यानंतर पतसंस्थेचा व्यवस्थापक फरार झाला. मागील तीन वर्षांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी या फरार व्यवस्थापकाला शोधण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविली. त्यात त्यांना यश आले असून पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी फरार व्यवस्थापकास ब्रम्हपुरी येथून अटक केली. सुनील येरमे असे अटकेतील व्यवस्थापकाचे नाव आहे.

चंद्रपूर येथील गांधी चौकात प्रतिष्ठा महाबचत लि. या नावाने २०१५ मध्ये पतसंस्था सुरु करण्यात आली. गडचिरोलीचे श्यामकुमार मडावी हे अध्यक्ष, तर सुनील येरमे हे व्यवस्थापक होते. गावागावांत एजंट नेमून ग्राहकांना विविध योजना आणि दामदुपटीने आमिष दाखवून पतसंस्थेत पैसे जमा करायला लावले. कालावधी पूर्ण झाल्यानंतर पतसंस्था बंद करून मडावी, येरमे यांनी पळ काढला. या प्रकरणाची काही ग्राहकांनी २०१८ मध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर श्यामकुमार मडावी याला पोलिसांनी अटक केली. मात्र व्यवस्थापक येरमे हा फरार होता.

मागील तीन वर्षांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी या फरार व्यवस्थापकाला शोधण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्यावर सोपविली. त्यानंतर पोलीस निरीक्षक खाडे यांनी तपास सुरु केला. सुनील येरमे हे ब्रम्हपुरी येथे एका घरी किरायाने राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून येरमे याला ब्रम्हपुरी येथून अटक केली आहे.