बारावी निकालाचा राज्य मंडळाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. सीबीएसईच्या धर्तीवरच निकाल लावला जाणार आहे. दहावी, अकरावी व बारावीच्या परीक्षांचे अनुक्रमे 30 : 30 : 40 पैकी गुणांमध्ये रुपांतर करून अंतिम निकाल सीबीएसईकडून जाहीर केला जाणार आहे. राज्यातही याच सूत्राच्या आधारे निकाल जाहीर होणार आहे.
देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बारावी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यामुळे यंदा बारावीचा निकाल 30:30:40 या सूत्राच्या आधारे लावण्याचे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) जाहीर केले आहे. यानुसार बारावीचा निकाल लावताना दहावी, अकरावी आणि बारावीतील वर्षांची कामगिरी लक्षात घेतली आहे. यामध्ये तीनही वर्षांमध्ये झालेल्या परीक्षा, अंतर्गत मूल्यमापनाचा विचार केला आहे.
विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेमध्ये सर्व विषयांमध्ये मिळालेल्या गुणांचे रुपांतर 40 पैकी गुणांमध्ये करण्यात येणार आहे. तर दहावी आणि अकरावीच्या वर्षात दिलेल्या अंतिम परीक्षांमध्ये मिळालेल्या 100 पैकी गुणांचे रुपांतर 30 पैकी केले जाणार आहे. असे मूल्यांकन केले जाईल असे सीबीएसईकडून न्यायालयात स्पष्ट करण्यात आले आहे. सीबीएसईने असे सूत्र जाहीर केल्यानंर राज्यातीलही सूत्र त्याचपद्धतीने करण्याबाबत हालचालींना वेग आला होता. आता हेच सूत्र राज्यातही लागू करण्यात येणार आहे.