ओबीसी, मराठा आरक्षणाचा आग्रह धरल्यानेच भाजपा आमदारांचे निलंबन! – देवराव भोंगळे

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

लोकशाहीच्या हत्येविरोधात भाजपाचे आंदोलन

चंद्रपूर : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत सरकारचा नाकर्तेपणा दाखवून दिल्यामुळे सरकारने खोटे आरोप लावून भारतीय जनता पार्टीच्या बारा आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बल्लारपूर येथे नगरपरिषद चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले.

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नगराध्यक्ष हरीश शर्मा, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, भाजपाचे शहराध्यक्ष काशी सिंग,प्रदेश भाजपा कामगार आघाडीचे अजय दुबे, जेष्ठ नेते शिवचंदजी द्विवेदी, वैष्णवीताई जोशी, अरुण बुरडकर, देवा वाटेकर हे सहभागी झाले होते.

केवळ दुष्ट हेतूने केलेली बारा आमदारांची निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या भूमिकेस तोंड देण्याची हिंमत सरकारने दाखवावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.

राज्यातील वसुली सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आरक्षण गमावले असून हे आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत भारतीय जनता पार्टी राज्यात संघर्ष करतच राहील असा इशारा याप्रसंगी बोलताना श्री. देवराव भोंगळे यांनी दिला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या आक्रमकपणाला तोंड देण्याची हिंमत महावसुली सरकारमध्ये नसल्यामुळेच दडपशाही करून सभागृहात ओबीसी आरक्षणाचा आवाज दाबण्याकरिता सरकारने १२ आमदारांचे केलेले निलंबन म्हणजे लोकशाहीचा खून आहे, असे ते म्हणाले. ठाकरे सरकारला ओबीसी आरक्षण देण्याची इच्छाच नाही, तर केवळ वेळकाढूपणा करून ओबीसी समाजाची फसवणूक करावयाची आहे. त्यामुळेच, केंद्राकडे इम्पिरिकल डाटा मागण्याचा कांगावा करून विधानसभेतही फसवा ठराव करण्याचा सरकारचा डाव असून तो हाणून पाडण्यासाठी भाजपने वैधानिक मार्गाने सभागृहात आवाज उठवू नये यासाठीच हा लोकशाहीविरोधी कारवाई करण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला.

ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आवश्यक माहीती तयार करावी लागेल व केवळ मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करूनच अशी माहिती तयार करता येणार आहे, हे स्पष्ट असूनही यासंदर्भात केंद्र सरकारकडे ठराव पाठवून ठाकरे सरकार केवळ टोलवाटोलवी करत आहे, असे श्री देवराव भोंगळे म्हणाले.
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे गमावलेले आरक्षण पुन्हा मिळवून देईपर्यंत भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता संघर्ष करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनात हरीश शर्मा, द्विवेदी महाराज, आशिष देवतळे, अजय दुबे काशीनाथ सिंह, देवा वाटेकर, गोपाल रेड्डी यांची समायोचित भाषणे झाली.

याप्रसंगी, जिल्हा वाहतुक आघाडीचे सतविंदरसिंह दारी, गुलशन शर्मा, अरुण बुरडकर, भाजयुमोचे मिथिलेश पांडे, प्रतिक बारसागडे, महीला आघाडीच्या वैशालीताई जोषी, नगरसेविका सारिका कनकम, सुरेंद्र राणा, मनिष रामिल्ला, श्रीकांत उपाध्याय, नगरसेवक स्वामी रायबरम, शुभम बहुरिया, राहूल बहूरिया, श्रवन मोरगम आदिंसह भाजपचे इतरही स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.