संततधार पावसामुळे बल्लारपूरात भिंत कोसळून वृध्द महिलेचा मृत्यू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• सोयाबिन भूईसपाट, अनेक घरात घुसले पाणी
• दुकानांतील लाखो रुपयांच्या वस्तू गेल्या वाहून

चंद्रपूर : जिल्हयात तिन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बल्लारपूर, कोरपना, राजूरा जिवती तालुक्यात पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर बल्लारपूर शहरात भिंत कोसळून एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच जिवती- जिवती शहरातील काही घरांत तसेच काही दुकानांत घुसल्यामुळे दुकानांतील वस्तू वाहून गेल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तर अनेक घरांची सुद्धा पडझड झाली आहे.

जिवतीत घरांची पडझड; साहित्याचे नुकसान

जिवती शहरातील शेडमाके चौक ते तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर मोठा नाला असून या नाल्यावर रात्रीच्या जोरदार पावसामुळे पूर आला यामध्ये नाल्याला लागूनच असलेल्या जांबळे रेडिमेट कापड दुकान,दर्शन फोटो स्टुडिओ,गोरे संगणक ग्राहक सेवा केंद्र आणि आक्रपे संगणक ग्राहक सेवा केंद्र यांच्या दुकानात पाणी घुसले.त्यामुळे कापड दुकानातील सर्व कपडे वाहून गेले नएवढेच नाही तर ग्राहक सेवा केंद्रातील संगणक व पीसीओ सुद्धा साचलेल्या पाण्यामुळे निकामी झाले असून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सततच्या संततधार पावसाने घरांची पडझड झाली आहे.

भिंत कोसळून वृध्द महिलेचा मृत्यू

मागील 2 दिवसापासून बल्लारपूर शहरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बल्लारपूर शहरातील शिवाजी वॉर्ड येथील संजय राजाराम डुंबेरे यांच्या सॉ मिल मधील असलेल्या जुन्या गोदामाची भिंत कोसळून बाजूच्या इमारती मधील वास्तव्यास असलेली मिराबाई कटकंदिवार (वय-६८) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
सदर घटना रात्री 12:30 च्या दरम्यान घडली असून या घटनेचे वृत्त कळताच बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईचंवार, पोलीस उपनिरीक्षक तिवारी, तलाठी खरुले, अजय मेक्कलवार, संजय डुंबेरे, विशाल डुंबेरे ;ku, सामाजिक कार्यकर्ता व एनएसडी ची टीम उपस्थित होती. या अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेच्या पश्चात पती व दोन मुले आहेत.

कोरपना तालुक्यात पिकांचे नुकसान ; अनेक मार्ग बंद

कोरपना तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावातील शेत शिवारात पावसाचे पाणी घुसल्याने कपाशी, सोयाबीन आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक महत्वाचे मार्ग आज ही बंद आहेत.
तालुक्यातील पांच्यात्तर गावातील शेतशिवारातील पिकांना याचा मोठा फटका बसला. यात कोरपना सह कन्हाळगाव , नांदा , बिबी , पारडी , जेवरा, अंतरगाव , नारंडा, धानोली, वनसडी, सावलहिरा, कमलापूर, वडगाव, सोनुर्ली, आवारपूर, गाडेगाव, भारोसा, भोयेगाव, कवठाळा,लोणी, चिंचोली, कोडशी, पिपरी, पिपर्डा , शेरज, माथा आदी गावांचा समावेश आहे.

भोयगाव – चंद्रपूर हा महामार्ग मध्यरात्री पासून बंद पडला आहे.त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. अंतरगाव जवळील नाल्यावरील रपटा वाहून गेल्याने वनसडी – भोयगाव मार्ग बंद पडला आहे.तर सावलहिरा गावाजवळील रपटा वाहून गेल्याने गावकऱ्यांना जाण्या येण्याची अडचण निर्माण झाली आहे. अति पावसामुळे कोरपना – आदिलाबाद, कोरपना – वणी , वनसडी – भोयगाव, वणोजा – गडचांदुर् मार्ग ही जागोजागी उखडला गेला आहे. पैनगंगा – वर्धा या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत असल्याने नदीकडच्या गावाला सतर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. अमलनाला व पकडीगुद्दम धरण ओव्हर फ्लो झाल्याने सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे.