बल्लारपूर शहरात 4 ते 5 जणांचा तलवारीने हल्ला

चंद्रपूर : गोळीबार प्रकरण ताजे असतांना बल्लारपूर शहरात पुन्हा टोळी युद्ध सुरू झाले असून 23 जुलैला रात्री 8 वाजेदरम्यान बालाजी वार्डात संदीप उर्फ बोग्गा सुरेश दवंडेवार रा. महाराणा प्रताप वार्ड यांचेवर 4 ते 5 जणांनी तलवारीने हल्ला केला.

या हल्ल्यात संदीप हा गंभीर जखमी झाला असून नेमका वाद कश्यामुळे झाला याचं कारण सध्या अस्पष्ट आहे.
सूत्राद्वारे मिळालेल्या माहितीनुसार संदीप हा आपल्या मित्रांसोबत बालाजी वार्ड येथे बसून होता, मात्र त्यावेळी संदीपने आपल्या मित्राला सिगारेट आणण्यासाठी दुकानात पाठविले नेमकं त्याचवेळी युवकांच्या घोळक्याने अचानकपणे संदीपवर तलवारीने हल्ला केला.

ह्या हल्ल्यात संदीप पूर्णपणे रक्तबंबाळ झाला, संदीपच्या मित्रांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, संदीप ची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. बल्लारपूर पोलिसांनी सदर प्रकरणातील आरोपी 26 वर्षीय विशु कोंडावार याला अटक केली असून 3 आरोपी फरार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात आता युवकांच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे, एक लहानसा वाद उग्र रूप धारण करीत आहे, या टोळी युद्धात आता बंदूक, चाकु व तलवारीचा उपयोग होत आहे, सध्या सुरू असलेले टोळीयुद्ध पोलिसांना आवाहन देत आहे, पोलिसांनी जर वेळीच अश्या टोळ्यांना आवरले नाही तर पुढे हे चित्र अजूनही भयावह असेल. आरोपी व जखमी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.