महापौरांच्या नगरसेवक पतीवर गुन्हा दाखल
चंद्रपूर : महानगर पालिकेच्या आमसभेत काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये राडा झाल्यानंतर महापौर राखी कंचर्लावार यांचे पती नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी उपायुक्त विशाल वाघ यांच्या कक्षात जाऊन अश्लिल शिवीगाळ केली. त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. वाघ यांनी पोलिसात तक्रार केली असून संजय कंचर्लावार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मनपाच्या आमसभेत आज गुरुवारी प्रचंड राडा झाला. काँग्रेस आणि भाजपने एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार केली. आमसभा आटोपल्यानंतर महापौर राखी कंचर्लावार यांनी उपायुक्त विशाल वाघ आणि अतिरिक्त विपीन पालीवाल यांना आपल्या कक्षात बोलविले.
त्यावेळी महापौरांच्या कक्षात स्थायी समिती सदस्य रवी आसवानी, भाजपचे नगरसेवक देवानंद वाढई चंद्रकला सोयाम, कल्पना बगुलकर आणि महापौरांचे पती नगरसेवक संजय कंचर्लावार उपस्थित होते. यावेळी महापौरांनी आमसभेतील राड्याच्या अनुषंगाने वाघ आणि पालीवाल यांना काही सूचना केल्या. त्यानंतर कोणतेही कारण आणि अधिकार नसताना संजय कंचर्लावार यांनी मध्येच हस्तक्षेप केला.
वाघ यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तुम्ही बाहेरगावचे आहात. सांभाळून रहा.चारचौघांना पाठवून कोणत्या वार्डात मारून फेकणार, कुणाला माहीत होणार नाही, अशी धमकी संजय कंचर्लावार यांनी दिली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यानंतर वाघ यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संजय कंचर्लावार यांचयावर गुन्हा दाखल केला.