धान उत्पादक शेतक-यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी
चंद्रपूर : जिल्हयातील धान उत्पादक शेतक-यांच्या धानपिकावर मावा, तुडतुडयाच्या आक्रमणामुळे झालेल्या नुकसानाचे त्वरीत सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
चंद्रपूर जिल्हयातील चंद्रपूर, बल्लारपूर, पोंभुर्णा, सावली, मुल, नागभीड, सिंदेवाही, ब्रम्हपूरी, चिमूर हे तालुके धान उत्पादक तालुके आहे. धान हे या तालुक्यातील प्रमुख पीक आहे. ऑक्टोबर 2020 या महिन्यात सदर तालुक्यांमधील धानपीकांवर मावा व तुडतुडयाने आक्रमण केल्याने धानाच्या उत्पादनात यावर्षी मोठी घट होणार आहे. अनेकांचा उत्पादन खर्च सुध्दा भरून निघेल किंवा नाही अशी परिस्थीती आहे. शेतक-यांनी हा रोग आटोक्यात येण्यासाठी तीन ते चार वेळा फवारणी केली, मात्र रोग आटोक्यात आला नाही. मावा व तुडतुडयामुळे धानाचे पीक पूर्णपणे उध्दवस्त झाले आहे. शेतात केवळ तणीस शिल्लक आहे. आधीच आर्थीक हालअपेष्टा सहन करणारा धान उत्पादक शेतकरी या संकटामुळे हवालदिल झाला आहे. अद्याप धान उत्पादक शेतक-यांच्या या झालेल्या नुकसानाचे पंचनामे झालेले नाहीत. सदर नुकसानाचे पंचनामे तातडीने करून धान उत्पादक शेतक-यांना मदतीचा हात देण्याची नितांत आवश्यकता आहे, असेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.