बल्लारपूर (चंद्रपूर) : काल दुपारी बामणी प्रोटिन्स कारखान्यात घडलेल्या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना आर्थिक मोबदल्यासासाठी मृत व्यक्तीचे प्रेत कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ रात्री ठेवण्यात आले.
यावेळी स्थानिक नेते आणि भारतीय मजदूर संघ या कामगार संघटनेने नुकसान भरपाई देण्याची मागणी व्यवस्थापनाकडे केली असता, रात्री ११:३० च्या सुमारास व्यवस्थापणाने ती मान्य केली. पीडित कुटुंबाला तात्काळ १० लाखाची तर कारखान्यातील विमा सुरक्षा कवच’च्या माध्यमातून २५ ते ३० लक्ष रुपयांची आर्थिक तरतूद आणि कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी नौकरीसह अंत्यविधी खर्च देण्याच्या करारातून हे आंदोलन शमले. रात्री १२ वाजताच्या सुमारास मृतक व्यक्तीचे प्रेत मूळगावी दहेली येथे नेण्यात आले.
सोबतच या अपघातातील सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्याची आणि उपचारादरम्यान त्यांना पूर्ण वेतन देण्याची मागणी कामगार संघटनेच्या आणि स्थानिक नेत्यांनी लावून धरली होती. व्यवस्थापनाने हि मागणी मान्य केली.
यामुळे घडला अपघात
“कारखान्यात रसायनाच्या २० फूट खोल अश्या सात हंड्या आहेत. स्वच्छतेपुर्वी हंडीत पाणी टाकून घातक वायू नष्ट करून आठ तासाच्या अवधिनंतर हंडीतील वायू निकामी झाल्याची खातरजमा करून प्रत्येक दिवशी आळीपाळीने हंडीची स्वच्छता केली जाते. मात्र, हंडीत सौम्य गॅस’चा प्रभावामुळे विशाल मावलीकर यांचा मृत्यू झाला.
मृतक व्यक्तीचे वडिल वसंतराव मावलीकर यांच्या तक्रारीवरून कारखान्यातील प्रोसेस अभियंत्यावर ३०४ (अ), ३३८ आयपीसी धारा अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक एस.एस.भगत यांनी दिली आहेत.”
घटनेनंतर सर्व ६ कामगारांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
मृतक विशाल मावलीकर वगळता ईतर जखमींना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती व्यवस्थापनाने कळविली आहेत.
घटनेची माहिती शेजारी दहेली लावारी, जुनी दहेली, बामणी, बल्लारपूर या गावांमध्ये वाऱ्यासारखी पसरल्याने रात्रीपर्यंत नुकसान भरपाई
मिळण्यासाठी कामगार, ग्रामस्थ आणि स्थानिक नेते मृतदेह घेऊन कारखान्याचे प्रवेशद्वार गाठले. रात्री ११:३० च्या व्यवस्थापनाशी चर्चा करून तोडगा निघाला. यावेळी व्यवस्थापणाच्या वतीने सतीश मिश्रा, व्यवस्थापक केशवानी,चौहान तर भारतीय मजदूर संघाचे रमेश यादव आणि निंदेकर, उलगुलान संघटनेचे नेते राजू झोडे, दहेली’चे सरपंच योगेश पोतराजे यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते.
घटनेनंतर अवघ्या कालावधीत बल्लारपूर नगर परिषदेची रुग्णवाहिकेने घटनास्थळ गाठत अपघातग्रस्त कामगारांना रुग्णालयात दाखल केले. वेळेचे भान ठेवत क्षणाचाही विलंब न करता ग्रामीण रुग्णालयातील डॉ. मेश्राम, डॉ.पिंपळशेंडे यांच्यासह वैद्यकीय यंत्रणा आणि रुग्णवाहिकेतील चालकाच्या सतर्कतेमुळेच त्वरित उपचार मिळाल्यानेचं ईतर कर्मचाऱ्यांचा जीव वाचला. असे उपस्थित जमावकडून सांगण्यात आले.
घटनेचा तपास पोलीस निरीक्षक एस.एस.भगत यांच्यासह धर्मेंद्र जोशी करीत आहेत.