चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू होऊ न देण्याबाबत प्रशासनातर्फे खबरदारी घेण्यात यावी. कोरोनाच्या जास्तीत जास्त तपासण्या वाढवण्यावर भर देण्यात यावा. नागरिकांना कोरोना तपासणी सुलभ व्हावी म्हणून त्यांच्या दारातच कोरोना तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. यासाठी फिरत्या वाहनाद्वारे (मोबाईल टेस्टींग युनिट) तपासणी पथक सुरू करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीत आरोग्य यंत्रणेला दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगर पालीकेचे आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी बसचालक, ऑटोचालक, दुकानदार तसेच दैनंदिन व्यवहारात ज्यांचा जास्तीत जास्त व्यक्तींशी संबंध येतो अशा हाय रिस्क व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यावर भर देण्याचे सांगितले. तसेच येत्या काही दिवसात दिवाळी सण येत असून खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडतील. त्यावेळी नागरिक व व्यापारी-दुकाणदार यांनी कोरोनापासून बचाव करणे गरजेचे आहे. याबाबत व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी संबंधीतांना दिले. नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
आरोग्य यंत्रणेकडे कोरोना उपचार केंद्रात पुरेसे डॉक्टर आहेत का, अन्टीजन टेस्ट किट, तसेच करोनाबाधितांच्या उपचारामधील महत्त्वाचा घटक असलेल्या रेमडिसिव्हर या इंजेक्शनची व इतर औषधांची पुरेशी उपलब्धता, मनुष्यबळ, ऑक्सीजन बेड याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधीतांना विचारपूर करून माहिती जाणून घेतली. कोरोना हॉस्पीटलमध्ये कोरोना रुग्णांना नातेवाईकांशी बोलण्यासाठी व रुग्णांची माहिती जाणून घेण्यासाठी ठरावीक वेळेत व्हीडीओ कॉलींग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
बैठकीला आरोग्य यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणेचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.